छोटय़ा व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी अथवा काळाबाजार याकडे गुन्हा म्हणून पाहिले जाणार नाही, व्यापाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केल्याने बिहारमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची लक्षणे दिसत आहेत.
कुटुंबाचा चरितार्थ चालावा आणि मुलांना शिक्षण मिळावे यासाठी छोटे व्यापारी साठेबाजी आणि काळाबाजार करतात याची आपल्याला जाणीव आहे, असे मांझी म्हणाले. बिहार राज्य अन्नधान्य व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
साठेबाजी आणि काळाबाजार होत असल्याची आपल्याला कल्पना असली, तरी छोटय़ा व्यापाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, सरकार आपल्याविरुद्ध कारवाई करणार नाही, असे मांझी यांनी सांगताच तेथे उपस्थित असलेले केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग स्तंभित झाले. छोटय़ा व्यापाऱ्यांनी साठेबाजी अथवा काळाबाजार केल्यास त्याचा बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठय़ावर परिणाम होत नाही, कारण साठेबाजी अत्यल्प प्रमाणावर असते, असेही मांझी म्हणाले.

Story img Loader