शिवसेनेला बरोबर न घेता अल्पमतातील सरकार स्थापन केल्यास विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळीच बहुमताचा कस लागणार असून सरकारची सत्त्वपरीक्षा होणार आहे. त्यामुळे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या आधीच ही परीक्षा भाजप सरकारला पार द्यावी लागणार असल्याने शिवसेनेची मदत घेण्याचे प्रयत्न आहेत. मात्र ही परीक्षा पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास भाजपच्या उच्चपदस्थांनी व्यक्त केला. अध्यक्षपदासाठी एकनाथ खडसे किंवा गिरीश बापट यांच्या नावांवर विचार सुरू असल्याचे समजते.
नवी विधानसभा अस्तित्वात आल्याने आधी अध्यक्षांची निवड करावी लागते. संकेतानुसार सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होते. त्यामुळे शेकापचे गणपतराव देशमुख हे ११व्या वेळी विधानसभेत निवडून आल्याने त्यांना हंगामी अध्यक्ष केले जाईल. नंतर आमदारांना शपथ दिली जाईल. त्यानंतर नियमित अध्यक्षांची निवड केली जाईल.
अल्पमतातील सरकार चालविताना सभागृहात सरकारची अडचण होऊ नये, यासाठी अध्यक्षांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे अध्यक्षही खंबीर व भाजपची बाजू सांभाळून घेईल, असा निवडावा लागणार आहे. अध्यक्षांच्या निवडीच्या वेळीच सरकारच्या पाठबळाचा कस लागणार असून भाजपला संख्याबळ मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या आधी ही कसोटी पार पाडावी लागणार आहे.
मुख्यमंत्री निवड कशी होणार?
भाजपच्या प्रथेप्रमाणे आमदारांचा कल केंद्रीय निरीक्षक जाणून घेतील. कोणत्या नेत्याच्या मागे बहुसंख्य आमदार आहेत, याचा अहवाल अभ्यासून मग कोणाला नेता निवडायचे, याचा निर्णय होईल. अंतिम निर्णयाचा अधिकार केंद्रीय संसदीय मंडळास आहे. इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन टाळण्यासाठी तसेच पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी बैठकीस हजर असल्याने नेत्याचे नाव आधीच ठरवून ज्येष्ठ नेत्यांनी ते सुचवायचे व त्याला अन्य नेत्यांनी अनुमोदन द्यायचे, या पद्धतीनेही नेतानिवड होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
गडकरींना कानपिचक्या
मुख्यमंत्रिपदात रस नसल्याचे सांगत ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये गेले दोन-तीन दिवस शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या असून, त्यामुळे गडकरी समर्थकांची मोहीम थंडावल्याचे समजते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्याशी चर्चा केली. पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आणणे उचित नसून हे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याची तंबी देण्यात आली आहे.
शिवसेनेशी अंतिम चर्चा मंगळवारी?
शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार स्थापन करायचे, की त्यांच्याशिवाय करायचे, याचा निर्णय मंगळवारीच होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यास किंवा तयारी दाखविल्यास राजनाथ सिंह व अन्य नेत्यांशी चर्चा होऊन त्या दिवशी अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
३० तारखेचा मुहूर्त शुभ
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्याची दाट शक्यता असून शपथविधीसाठी ३० तारखेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. फडणवीस यांचा देवावर विश्वास असला तरी प्रत्येक वेळी मुहूर्त पाहूनच सर्व काही करायचे, अशी त्यांची भूमिका नसते. मात्र ज्योतिष्यांच्या सल्ल्याने ही तारीख निवडली असल्याचे समजते.
मंत्रिमंडळ लहान
केंद्राच्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लहान मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे भाजपने ठरविले असून गृह, नगरविकास, महसूल, अर्थ, उद्योग ही महत्त्वाची खाती कोणत्या ज्येष्ठ नेत्यांकडे द्यायची आणि शिवसेनेला बरोबर घेतले तर त्यांना कोणती खाती द्यायची, यावर भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे. शिवसेनेबाबतचा निर्णय झाल्यानंतर खात्यांचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांबरोबर १५ ते २० मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यापैकी १२-१३ कॅबिनेट मंत्री असतील. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2014 रोजी प्रकाशित
शक्तीपरीक्षा सभागृहातच!
शिवसेनेला बरोबर न घेता अल्पमतातील सरकार स्थापन केल्यास विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळीच बहुमताचा कस लागणार असून सरकारची सत्त्वपरीक्षा होणार आहे.

First published on: 27-10-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp faces challenge to elect assembly speaker in maharashtra