राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने मराठवाडय़ातही प्रथमच ४६पैकी तब्बल १५ जागा जिंकून बाजी मारली. शिवसेनेला ११, काँग्रेसला ९, तर राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्या. पंकजा मुंडे यांनी परळीचा गड राखला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम खाडे-मुंडे यांनी देशात विक्रम ठरेल अशा प्रचंड मतांनी विजय मिळवला.
एमआयएमने औरंगाबाद मध्य मतदारसंघातील जागा जिंकून खाते उघडले. या पक्षाचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास तडा दिला. विनायक पाटील (अहमदपूर, लातूर) व मोहन फड (पाथरी, परभणी) हे दोन अपक्ष विजयी झाले. काँग्रेसचे राजेंद्र दर्डा व राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभवाचा धक्का बसला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएममुळे मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होऊन दर्डा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राष्ट्रवादीचे राजेश टोपे (घनसावंगी, जालना), जयदत्त क्षीरसागर (बीड), काँग्रेसचे अमित देशमुख (लातूर शहर), डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), मधुकर चव्हाण (तुळजापूर), अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद) या माजी मंत्र्यांनी मात्र आपापले गड राखले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांच्यासह जालना जिल्ह्य़ात भाजपला तीन जागा मिळाल्या, तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नावामागे मतदार उभे राहिल्याचे दिसून आले. जालना मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांचा पराभव केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा