शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा वाद प्रामुख्याने ज्या चार-पाच जागांच्या अदलाबदलीवरुन पेटला, त्यापैकी माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव-कवठेमहंकाळ या मतदारसंघात आता भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सर्व स्टार प्रचारकांना तासगावच्या मैदानात उतरवून आर. आर. पाटील यांच्या पराभवासाठी कंबर कसलेल्या भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तासगावला आणले आहे. मोदी यांची रविवारी तासगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.
भाजपला शिवसेनेकडे असलेले जे काही खास मतदारसंघ हवे होते, त्यामध्ये तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघाचा पहिला क्रमांक होता. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय वातारणाचा फायदा घेण्यासाठी भाजपने काही नव्या मतदारसंघांची मागणी केली. भाजपने आर.आर.पाटील यांचे कट्टर विरोधक संजयकाका पाटील यांना हाताशी धरुन पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे साम्राज्य म्हणून ओळखला जाणारा सांगली लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या भगवा रोवला. विधानसभा निवडणुकीत त्यांना आत त्यांतील काही सुभेही आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत. सांगली, मिरज, जत हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आलेलेच आहेत. त्यांना आता आर.आर.पाटील यांच्या तासगाव-कवठे महंकाळवर आणि पतंगराव कदम यांच्या पलुस-कडेगावर चढाई करायची आहे.
महायुतीतील जागावाटपात भाजपने शिवसेनेकडील काही जागा मागितल्या होत्या, त्यात प्रामुख्याने तासगाव-कवठे महंकाळ या मतदारसंघाचा समावेश होता. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी एका वार्तालापात आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २७ सप्टेंबरच्या पहिल्याच जाहीर प्रचारसभेत त्याचा उच्चार केला होता. सेनेकडील गंगापूर, तासगाव-कवठेमहंकाळ, पनवेल, भुसावळ या जागा द्यायला नकार दिल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे भाजपची पंचाईत झाली. आर.आर.पाटील यांचे आणखी एक कट्टर प्रतिस्पर्धी आणि माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने त्यांची उमेदवारी निश्चित केली होती. त्यांच्या प्रवेशाच्या समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे असे भाजपचे आघाडीचे नेते होते.
शिवसेनेकडून ही जागा सुटली नाही. आता युती तुटलयाने भाजपला या जागेसाठी सारी ताकद पणाला लावावी लागली आहे. नरेंद्र मोदी यांची खास तासगावमध्ये सभा घेऊन आबांना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Story img Loader