आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी गुरुवारी भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी स्वच्छता अभियानाला अराजकीय पद्धतीने सुरुवात केली. मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या स्वच्छतेच्या कार्यक्रमात भाजपचे नेते सहभागी झाले होते. मात्र, या ठिकाणी कोणतेही राजकीय वक्तव्य करण्याचे किंवा पक्षाचे झेंडे वापरण्याचे त्यांनी पूर्णपणे टाळले. केवळ हे अभियान जनअभियान व्हावे, एवढीच प्रतिक्रिया नेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमातून कोणताही राजकीय संदेश दिला जात नाही ना, हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व ठिकाणी आपले कॅमेरे पाठविले होते. सर्व कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
मुंबईत खार रेल्वे स्थानक ते एस. व्ही. रस्ता या मार्गावर गुरुवारी सकाळी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम झाला. बोरिवली येथे झालेल्या कार्यक्रमाला या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी हजर होते.
आचारसंहितेच्या काळात शासकीय खर्चाने कोणताही सरकारी कार्यक्रम होणार असेल, तर तिथे राजकीय नेत्यांना भाषणबाजी करता येत नाही. अगदी झेंडावंदनाचा कार्यक्रम असेल तर तिथेही राजकीय नेत्यांना भाषण करता येत नाही. त्यामुळे स्वच्छता अभियान या सरकारी कार्यक्रमाचा भाजप नेते लाभ उठविण्याचा प्रयत्न करतात का, याकडे इतर राजकीय पक्षांचे लक्ष होते. निवडणूक आयोगही या कार्यक्रमावर लक्ष ठेवून होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा