विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर राज्यात काय चित्र दिसते आहे, यावर भाष्य केले.
ते म्हणाले, शिवसेनेशी युती तुटल्याचे सत्य आम्ही स्वीकारलेले आहे. युती तुटल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आमचेच सरकार सत्तेवर येईल. मतदार मतदान करताना जातपात, प्रादेशिक वाद यांचा विचार करणार नाहीत. यावेळी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल.
रामदास आठवले हेसुद्धा भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीमध्येच येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आठवले यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी रिपब्लिकन पक्षांतील अनेकांची इच्छा आहे. भाजपची प्रदेश कार्यकारिणीही त्यांना मंत्रिपद देण्याबाबत सकारात्मक आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.