ठाणे, पालघर या दोन जिल्ह्य़ांमध्ये मुसंडी मारायची आणि राज्यातील सत्तास्पर्धेचा सोपान गाठायचा, अशी आखणी करत गेल्या पाच महिन्यांपासून या सगळ्या पट्टय़ात सत्ताधशांच्या थाटात वावरणाऱ्या शिवसेना नेत्यांचे विमान रविवारी जाहीर झालेल्या निकालांमुळे अखेर जमिनीवर आले. या दोन जिल्ह्य़ांमधील विधानसभेच्या २४ जागांपैकी नऊ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर (सात जागा) आघाडी तर मिळवलीच शिवाय ठाणे शहरासारखा पक्षाचा बालेकिल्लाही शिवसेनेकडून हिरावून घेतला. अतिशय अनुकूल वातावरण असतानाही उमेदवार देताना केलेल्या गफलतींमुळे सेनेला हक्काच्या जागांवरही पाणी सोडावे लागले. ठाण्यात रवींद्र फाटक, कळवा-मुंब््रयात दशरथ पाटील, कल्याण पूर्वेत गोपाळ लांडगे, पश्चिमेत विजय साळवी, भिवंडीत मनोज काटेकर अशा चुकीच्या उमेदवारांची फौज मैदानात उतरवून लढाईजिंकण्याच्या बेत आखणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी पळता भुई थोडी करून सोडले.
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्य़ांतील जवळपास प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद आहे. त्यामुळे २४ पैकी किमान १५ जागांवर विजय मिळविण्याचे मनसुबे सेनेच्या गोटात आखण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील तब्बल ११ विधानसभा क्षेत्रांत शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हे यश आपलेच या भ्रमात असलेले शिवसेना नेते मंत्री झाल्याच्या थाटातच वावरू लागले होते. महायुतीत फाटाफूट झाल्यानंतर खरे तर प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करून उमेदवार देण्याची आवश्यकता होती. मात्र, ठाण्यातील िशदेशाहीपुढे मान तुकवत ‘मातोश्री’ने एकापाठोपाठ चुकीचे उमेदवार जाहीर केले आणि वरवर सोपा वाटणारा पेपर कठीण करून घेतला. शिवसेनेसाठी एरवी सुरक्षित मानला जाणारा ठाणे शहर मतदारसंघ रवींद्र फाटक यांना सोपा जाणारा नाही, असे पक्षातील जुन्या-जाणत्यांचे मत होते. ‘विजय चौगुलेंचे जे झाले तेच फाटकांचे होईल’, असा सावध इशाराही एकनाथ िशदे यांना दिला जात होता. िशदे यांनी हातचा मतदारसंघ गमविल्याची टीका आता सुरू झाली आहे. स्वत: िशदे यांनी ठाणे शहर मतदारसंघ लढवावा, तर फाटक यांना कोपरी-पाचपाखाडीतून उमेदवारी द्यावी, असा सूर पक्षात होता. मात्र, स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघाची तजवीज करून घेताना िशदे यांनी शिवसेनेसाठी अस्मितेचा मानला जाणाऱ्या ठाण्यासारखा मतदारसंघ असुरक्षित करून घेतला.
भाजपची मुसंडी
जिल्ह्य़ातील राजकारणात भाजपला कस्पटासमान लेखण्यातच धन्यता मानणाऱ्या शिवसेनेला यंदा मोठा फटका बसला आहे. ठाण्यासह डोंबिवली, कल्याण (पश्चिम) या संघाचा प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात विजय मिळवताना भाजपने किसन कथोरे यांच्या रूपाने जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही चंचूप्रवेश केला आहे. मुरबाड, बेलापूर, मीरा-भाइंदर, भिवंडी (पश्चिम) या मतदारसंघात विजय मिळवताना शिवसेनेच्या परंपरागत मतांच्या रसदेवर भाजपने डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व मतदारसंघांत गुजराती-मारवाडी मतदारांनी भाजप उमेदवाराला एकगठ्ठा मतदान केल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.पालघर जिल्ह्य़ातील डहाणू आणि विक्रमगड मतदारसंघात भाजपने विजय मिळवला असून पालघरमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा पराभव करत शिवसेनेचे कृष्णा घोडा विजयी झाले आहेत. वसईत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी विवेक पंडित यांचा सुमारे ३१ हजार मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत दणकून आपटल्यानंतर ही निवडूण ठाकुरांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. त्यामुळे स्वत: िरगणात उतरून त्यांनी आपल्या विरोधकांना चारीमुंडय़ा चित केले आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास भाजपकडून खिंडार
ठाणे, पालघर या दोन जिल्ह्य़ांमध्ये मुसंडी मारायची आणि राज्यातील सत्तास्पर्धेचा सोपान गाठायचा, अशी आखणी करत गेल्या पाच महिन्यांपासून या सगळ्या पट्टय़ात सत्ताधशांच्या थाटात वावरणाऱ्या शिवसेना नेत्यांचे विमान रविवारी जाहीर झालेल्या निकालांमुळे अखेर जमिनीवर आले.
First published on: 20-10-2014 at 04:40 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp raises in thane palghar