शिवसेनेबरोबरची युती टिकावी अशी भाजपची इच्छा असली, तरी ती टिकेल असे वाटत नसल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. तर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही युती टिकावी, अशी इच्छा आहे. शिवसेनेने ‘मिशन १५०’ ठरविले आहे, पण ते ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र’ असले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. युती टिकविण्यासाठी शिवसेनेने धावाधाव सुरू केली असून ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जागावाटपाचे नवीन सूत्र जाहीर करताना शिवसेना १५१ व भाजप ११९ आणि घटकपक्षांना १८ जागा देण्याचा प्रस्ताव दिला. मात्र तो भाजपने फेटाळल्यावर उभय पक्षांमध्ये चर्चा झालेली नाही. सध्याच्या परिस्थिीत युती टिकणे अवघड असल्याचे खडसे यांनी सांगितले. दोन्ही पक्ष स्वत:च्या भूमिकांवर ठाम असल्याने युती टिकविण्याची इच्छा असली तरी ती राहील, असे सध्याच्या अवघड परिस्थितीवरून वाटत नाही, असे खडसे यांनी सांगितले. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही युतीची अवस्था अतिदक्षता विभागातील रुग्णाप्रमाणे असल्याचे सांगितले. त्यामुळे युतीमध्ये लाथाळया सुरूच असून जागावाटपाचा तिढा अजूनही ‘जैसे थे’ आहे. युती तुटण्याच्या वाटेवर असल्याने स्वबळावर लढण्याची तयारी करण्यासाठी भाजपने राज्यातील प्रदेश पदाधिकारी, खासदार-आमदार यांची तातडीची बैठक दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात सकाळी ११ वाजता बोलाविली आहे.
भाजपचा सन्मान हवा
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शहा यांनाही गेली २५ वर्षे असलेली युती कायम रहावी, अशीच इच्छा असली तरी आम्हाला आमच्या मागणीनुसार जागाही हव्या आहेत. योग्य सन्मान राखला जायला हवा, असे माथूर यांनी सांगितले. भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन २७२’ ठरविले होते, पण कोणत्याही घटक पक्षांच्या जागा कमी केलेल्या नव्हत्या. विधानसभेसाठी शिवसेनेने जे मिशन १५० ठरविले आहे, त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. आकडय़ांचे लक्ष्य ठरविण्याऐवजी ते काँग्रेसमुक्त महाराष्ट्र असे असले पाहिजे, असे माथूर यांनी स्पष्ट केले.
चर्चा कोणाशीही करावी
शिवसेनेने ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्याशी युतीबाबत चर्चा केली आहे. यासंदर्भात विचारता माथूर म्हणाले, मीही तसे ऐकले आहे. पण ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. कोणीही कोणाशीही बोलण्यास काहीच हरकत नाही. कोणत्याही चर्चेतून काही तोडगा किंवा सूत्र निघाले, तर ते माझ्याकडे किंवा अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे विचारासाठी येईल.
किसन कथोरे  भाजपात
राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड येथील आमदार किसन कथोरे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. आणखी एक मंत्री भाजपच्या संपर्कात असून एक-दोन दिवसांत त्यांच्याबाबत निर्णय होईल, असे खडसे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा