देशभरातील जनतेचा विश्वास संपादन केल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता दिल्लीत विधानसभा लढविण्याची आम्हाला भीती कशाला वाटेल, अशी विचारणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. तसेच दिल्लीतील राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर केंद्र सरकार आणि भाजपकडून निर्णय घेण्यात येईल, असे दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभेच्या तीन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. याचा अर्थ भाजप विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्यास कचरतो असा घेऊ नये, उलट आता निवडणुका झाल्यास आम्ही जिंकू याविषयी खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच निवडणुकीस सामोरे जाण्यास तयार आहेत का याबद्दल शंका आहे, असा आरोप उपाध्याय यांनी केला.
सध्या असलेल्या संख्याबळाच्या आधारावर दिल्लीत सरकार स्थापन करायचे, तर काही आमदारांची ‘जुळवाजुळव’ करावी लागेल आणि अशी जुळवाजुळव करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ठाम विरोध असून त्यापेक्षा भाजपने नव्याने निवडणुका घेण्यासाठी सज्ज राहावे, अशी संघाची भूमिका आहे. त्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला व्यापक जनाधार असल्याचेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे उपाध्याय यांनी नमूद केले. अवघ्या ४९ दिवसांत आम आदमी पक्षाचे सरकार पायउतार झाल्यामुळे १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे.