मोदी लाटेमुळे नव्हे तर सदोष मतदान यंत्रांमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत एवढय़ा प्रमाणात मतदान मिळाल्याचा जावईशोध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लावला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवल्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी अनेक मतदारसंघातील उमेदवारांकडून मतदान यंत्रात गडबड झाल्याबद्दल काँग्रेस समितीकडे तक्रारी येत असल्याचे सांगितले. काँग्रेसला ज्या ठिकाणी ९० टक्के मते मिळण्याची अपेक्षा होती तेथे केवळ तीन आणि चार टक्के मते मिळाली. असे का घडले, हा संशोधनाचा विषय आहे. याचा तपास होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले, परंतु यासंदर्भात प्रदेश काँग्रेस समितीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. उमेदवार वैयक्तिक तक्रार करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक २८ ऑक्टोबरला दिल्लीत बैठक आहे. त्यात विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि अन्य पक्ष संघटनांबद्दल चर्चा होणार आहे.
दुसरीकडे ठाकरे यांनी प्रस्थापितविरोधी लाट होती, असेही मान्य केले. ते म्हणाले, गेली १५ वर्षे सत्तेत राहिलो. जनतेच्या विकासाची कामे केली, परंतु जनतेच्या अपेक्षा त्याहून अधिक होत्या. नेमकी ही बाब हेरून भाजपने सर्व समस्यांवर आमच्याकडे रामबाण उपाय असल्याच्या थाटात प्रचार केला. जनतेने त्यांच्यावर भरवसा केला. निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप आणि शिवसेनेसारख्या सांप्रदायिक पक्षांना काँग्रेसचा कोणताही आमदार पाठिंबा देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींचे नेतृत्व सक्षम
भविष्यात देशाला आणि काँग्रेसला राहुल गांधी यांचे नेतृत्त्व लाभणार आहे. देशाला स्थिर आणि काँग्रेसला मजबूत तेच करू शकतात. त्यांचे नेतृत्त्व सक्षम आणि परिणामकारक आहे, असे माणिकराव म्हणाले. भविष्यात कदाचित गांधी आडनाव नसलेली व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होऊ शकेल. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या वक्तव्यावर ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा