भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुणे पदवीधरचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपविली जाण्याची माहिती शनिवारी मिळाली. पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी पाटील यांनी मंत्रिपदापेक्षा पक्षाची जबाबदारी स्वीकारण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्याचे पक्षाने निश्चित केले असून नितीन गडकरी यांनीही आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितल्याने फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्यातील अडथळे दूर  झाले आहेत.
रिक्त होणाऱ्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्राकडे सोपवून सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठांचा आहे. याशिवाय कोल्हापूरचे आ. चंद्रकांत पाटील यांचे आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे संबंध निकटचे असल्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यास शहा अनुकूल आहेत. आ. पाटील यांनी स्वत: मंत्रिपदापेक्षा पक्षाचे काम करण्यास प्राधान्य देण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांकडे सोपविली आहे. राज्यात सत्ता स्थापनेनंतर श्री. पाटील यांच्याकडे लगेचच प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil new maharashtra bjp president