केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन घेऊन केवळ आठ जागांच्या बदल्यात भाजपशी सोयरीक करणाऱ्या खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात गोंधळ उडाला आहे. भाजपने देऊ केलेल्या ८ पैकी ५ मतदारसंघात एबी फॉर्म नाही म्हणून रिपाइंच्या उमेदवारांनी अर्जच भरले नाहीत. परिणामी फक्त तीनच जागा अधिकृतपणे पक्षाच्या हातात राहिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपने चेंबूर, विक्रोळी, मानखुर्द-शिवाजीनगर, मुंब्रा, पिंपरी-चिंचवड, अंबरनाथ, मेहकर आणि देवळाली असे आठ मतदारसंघ रिपाइंला सोडल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु त्यापैकी चेंबूर, पिंपरी-चिंचवड आणि विक्रोळी या तीनच ठिकाणी रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरले. उर्वरित पाच ठिकाणी एबी फॉर्मच पोहचले नाहीत. पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी निर्णय व्हायला उशीर झाल्यामुळे गोंधळ झाल्याचे मान्य केले. परंतु त्या पाच मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत, त्यांना पांठिबा जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
रिपाइंमध्ये गोंधळात गोंधळ
केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन घेऊन केवळ आठ जागांच्या बदल्यात भाजपशी सोयरीक करणाऱ्या खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात गोंधळ उडाला आहे.
First published on: 29-09-2014 at 02:52 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaos in rpi over assembly election