मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दक्षिण कराड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असली तरी काँग्रेसचे आमदार विलासकाका पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय समितीने घ्यावा, असा निर्णय छाननी समितीने गुरुवारी घेतला. तसेच अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोकर मतदारसंघाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.
उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीचे काम संपले असून, अंतिम यादी नवी दिल्लीत पुढील आठवडय़ात निश्चित केली जाईल. उमेदवारांची नावे निश्चित करताना मुख्यमंत्र्यांची इच्छा असलेल्या दक्षिण कराड मतदारसंघाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जावा, अशी शिफारस छाननी समितीने केली आहे. अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोकर मतदारसंघातूनही कोणत्याच नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी अशोक चव्हाण यांची इच्छा आहे.
विलासकाका पाटील अडून बसले
दक्षिण कराड मतदारसंघाचे १९८० पासून प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेस आमदार विलासकाका पाटील मुख्यमंत्री चव्हण यांच्यासाठी माघार घेण्यास अजिबात तयार नाहीत. मुख्यमंत्री चव्हाण आणि विलासकाका पाटील यांचे संबंध कधीच चांगले नव्हते. पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांना विधानसभेवर निवडून येता यावे म्हणून विलासकाकांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची योजना पक्षाच्या वतीने मांडण्यात आली होती. पण विलासकाकांनी राजीनामा देण्यास नकार दिला. मध्यंतरी खुनाच्या आरोपात विलासकाकांच्या मुलाला झालेल्या अटकेमागे मुख्यमंत्री कारणीभूत असल्याचा समज पाटील समर्थकांचा झाला होता. मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात लढण्याची विलासकाकांची योजना आहे. भाजप पाटील यांना पाठिंबा देऊ शकते. मुख्यमंत्र्यांना अपशकून करण्याकरिता राष्ट्रवादी तयारीतच असल्याची चर्चा आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा