महायुती टिकवण्याच्या नावाखाली सर्वच घटक पक्षांकडून सुरू असलेली चर्चा तासागणिक नवीन वळणावर पोहोचत असून, काहीवेळापूर्वी महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढण्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आता आपण महायुतीतच राहणार असल्याचे म्हटले आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही महायुतीबरोबरच राहण्याचे सूचक वक्तव्य केले आहे. दरम्यान, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, बुधवारी संध्याकाळपर्यंत जागावाटपाबाबत अधिकृतपणे माहिती मिळण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे आघाडी करून निवडणूक लढवतील, असे सदाभाऊ खोत यांनी बुधवारी दुपारी जाहीर केले होते. त्याचबरोबर हे सर्व पक्ष बुधवारी संध्याकाळी आपली उमेदवारी यादी जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले होते. शिवसेना, भाजपने दिलेला सात जागांचा प्रस्ताव या सर्वच पक्षांनी फेटाळला होता. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे बुधवारी दुपारी सांगितले.
सोफीटेल हॉटेलमध्ये शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सात जागांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर ही चर्चा कोणत्याही निर्णयाविना संपुष्टात आली. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे जाहीर केले. यानंतर महादेव जानकर, राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. सुमारे तासभर या सर्व नेत्यांची मातोश्रीवर चर्चा झाली. या चर्चेनंतरच महादेव जानकर यांनी नव्या प्रस्तावावर चर्चा सुरू असून, त्यावर एकमत झाल्यास आपण महायुतीतच राहू, असे जाहीर केले.
दरम्यान, भाजपच्या कोअर समितीची मुंबईमध्ये बैठक झाली. त्यामध्ये सर्वच घटक पक्षांना बरोबर घेऊनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader