महाराष्ट्र व हरयाणात विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी लागणार असून, त्याच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेसने दोन्ही राज्यांत पराभवाची कबुलीच दिली आहे. या राज्यांमध्ये पक्षाला सत्ता टिकवणे कठीण असल्याचा सूर काँग्रेसमधून व्यक्त होत आहे. दोन्ही राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पक्ष राहील, अशी कबुली एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. महाराष्ट्रात १५ तर हरयाणात काँग्रेस दहा वर्षे सत्तेत असल्याने सत्ताविरोधी लाटेचा फटका बसेल असा अंदाज दुसऱ्या एका नेत्याने व्यक्त केला. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरयाणात चौताला यांचा राष्ट्रीय लोकदल दुसऱ्या क्रमांकावर राहील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मराठा मते काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत विभागली गेली तर हरयाणात जाट मते लोकदलाकडे वळाल्याने फटका बसेल असा अंदाज पक्षाने वर्तवला आहे. तसेच बिगर मराठा व बिगर जाट मते भाजपच्या मागे एकगठ्ठा गेली त्यामुळे त्याचा फायदा त्या पक्षाला मिळेल असे विश्लेषणही काँग्रेसमधून सुरू आहे.  
हरयाणात बिगर जाट मते तसेच दलित मते मोठय़ा प्रमाणात काँग्रेसला मिळत होती. यावेळी परिस्थिती बदलली असे काँग्रेसमधून मानण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांविरुद्ध केलेली वादग्रस्त विधाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या बाबी पराभवाला कारणीभूत ठरवण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे.
लोकसभा निकालांचा धसका
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने २८८ पैकी २४४ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. तर हरयाणाताली ९० पैकी ५८ मतदारसंघात भाजप व त्यावेळचा मित्रपक्ष हरयाणा जनहीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. तर काँग्रेसला केवळ आठ ठिकाणी आघाडी मिळाली होती. लोकसभेतील कल कायम राहिला तर काँग्रेसला फारशी अपेक्षाच नाही असे नेत्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader