या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी दोन लाखांवर मताधिक्याने विजय मिळविला. विशेष म्हणजे या वेळी प्रथमच जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघांत त्यांना विरोधकांपेक्षा जास्त मते मिळाली. जिल्ह्य़ात भाजप-सेनेची शक्ती वाढल्याचे त्यांनी दाखवून दिले. गेल्या २० वर्षांपासून जिल्ह्य़ातून काँग्रेस हद्दपार झाल्याने आता आपले अस्तित्व टिकविण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता गाजविणाऱ्या भारिप-बहुजन महासंघासमोर आपल्या आधीच्या जागा कायम राखण्याचे आव्हान आहे.
जिल्ह्य़ातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांना वरिष्ठ नेते महत्त्व देत नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असली तरी या वेळी नवे उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप-सेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भारिप-बमसं ही एक आघाडी अशी तिरंगी लढत जिल्ह्य़ात होणार आहे. महापालिकेत भारिप-बहुजन महासंघाने काँग्रेसच्या महापौरास विरोध केल्याने या दोन्ही पक्षांत तेढ निर्माण झाली आहे. त्याचे प्रतिबिंब येत्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे.
बाळापूर
भारिप-बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार यंदा पुन्हा या मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत. भारिपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे; पण त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये नाराजी असल्याने त्यांना या वेळी मोठे आव्हान राहणार आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे आहे. भाजपकडून जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व मनोहरराव हरणे यांची नावे पुढे आहेत. काँग्रेसकडून नारायणराव गव्हाणकर व लक्ष्मणराव तायडे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे संदीप पाटील यांनी पूर्वीपासून येथे प्रचार करून वातावरणनिर्मिती केली आहे. सिरस्कार यांना अस्तित्व कायम ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे.
अकोला (पूर्व)
येथे गेल्या दोन निवडणुकांत शिवसेनेला अंतर्गत वादामुळे भारिप-बमसंकडून पराभूत व्हावे लागले. या वेळी पुन्हा भारिपने हरिदास भदे यांनाच उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ जर शिवसेनेच्या वाटय़ाला गेला, तर अ‍ॅड. अनिल काळे, आमदार गोपीकिशन बाजोरिया हे इच्छुक असतील. दुसरीकडे सहकार गटाचे डॉ. सुभाष कोरपे यांचे नाव काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष तथा सहकार गटाचे शिरीष धोत्रे हेसुद्धा रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अकोला (पश्चिम)
विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल यावर चर्चा होत आहे. पालिकेतील भाजपचे गटनेते हरीश अलिमचंदानी तसेच अ‍ॅड. मोतीसिंह मोहता यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून विजय देशमुख इच्छुक आहेत. तसे झाल्यास प्रथमच अकोला पश्चिममध्ये तुल्यबळ लढत होईल. विजय देशमुख यांना काँग्रेसमधून किती पाठिंबा मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे. परंतु गोवर्धन शर्मा यांना पक्षाने निवडणूक लढविण्यास सांगितले तर विरोधकांची दमछाक होईल.
अकोट
सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे संजय गावंडे आमदार आहेत, पण गावंडे यांच्याविरुद्ध स्वपक्षीयांनी मातोश्रीकडे तक्रारी केल्या आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे व अर्थातच युतीचे प्राबल्य आहे. शिवसेनेकडून श्याम देशमुख यांचे नावसुद्धा चर्चेत आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हिदायत पटेल यांना काँग्रेस मैदानात उतरविणार आहे, असे दिसत आहे. सुधाकरराव गणगणे त्यांच्या मुलास येथून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या मतदारसंघातून भारिप-बमसंचे प्रदीप वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात भारिपचे प्राबल्य असल्याने काँग्रेसला येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.
मूर्तिजापूर
या मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे हे सध्या आमदार आहेत. येथील नगर परिषदेवर भारिप-बमसंचे वर्चस्व आहे, पण इतर भागात युतीचे वर्चस्व आहे. आमदार पिंपळे यांनी जनसंपर्क कायम राखल्याने व ते मूर्तिजापूरचे रहिवासी असल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. या मतदारसंघातही भाजप इच्छुकांची मोठी संख्या आहे. पंचायत समित्यांच्या जोरावर भारिप-बमसं या मतदारसंघात मोर्चेबांधणी करीत आहे. काँग्रेस वा राष्ट्रवादीला येथे बाहेरचा उमेदवार द्यावा लागणार आहे.