काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या चर्चेतून फार काही प्रगती होत नसल्याने काँग्रेसने सावध पवित्रा घेतला असून, छाननी समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व २८८ उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्यात आली.
काँग्रेसने गेल्या वेळी लढलेल्या १७४ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पण त्याच वेळी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ११४ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा केली. २००७ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी आघाडी तोडली होती. हा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसने सर्व २८८ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची यादी तयार केल्याचे एका नेत्याने सांगितले.
अशोक चव्हाण यांच्या पत्नीच्या उमेदवारीचा निर्णय प्रलंबित
भोकर मतदारसंघातून पत्नीला उमेदवारी देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. पण छाननी समितीने हा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीतच अंतिम निर्णय घेतला जावा, अशी भूमिका छाननी समितीने घेतली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीचा निर्णय त्यांनी पक्षाध्यक्षांशी चर्चा करून घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. पक्षाने विद्यमान ८२ पैकी बहुतांशी आमदारंना पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस केली आहे.