काँग्रेसचा अस्त जवळ येऊ पाहात असून येत्या पाच वर्षांत काँग्रेसचे देशव्यापी अस्तित्व संपुष्टात आलेले दिसेल, असे भाकित ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी वर्तविले. भाजपचा उदय आणि विजय या देशाच्या राजकारणातील थक्क करणाऱ्या घटना असून नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी ठरेल, असे मतही यादव यांनी व्यक्त केले.
मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित मोदी लाटेचा अन्वयार्थ आणि भविष्य या विषयावरील एका वार्तालाप कार्यक्रमात बोलताना यादव यांनी आपल्या विश्लेषणातून नव्या राजकारणाची समीकरणे उलगडली.  या देशातील लोकशाही बहुपक्षीय आहे, भाजपच्या यशामुळे त्यामध्ये फारसा बदल होईल, अशी शक्यता मात्र धूसरच आहे, मात्र, भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या राजकारणात भाजपचे भविष्य चांगले असेल आणि काँग्रेसचा मात्र ऱ्हास होईल, असा दावा यादव यांनी केला. येत्या पाच वर्षांत काँग्रेस देशभरातून अस्तंगत होण्यास सुरूवात होईल आणि केवळ निवडणुकीतील पराभव हे त्याचे कारण नसेल, असे भविष्यही यादव यांनी वर्तविले. भाजपच्या विजयामुळे राजकारणाची समीकरणे नव्याने मांडणे भाग पडणार असून भाजप हेच त्याचे केंद्रस्थान असेल व त्याभोवतीच सारे राजकारण फिरत राहील. सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्याचे आक्रमक तंत्र काँग्रेसला अवगतच नाही, तर बिहारसारख्या राज्यातील भाजपविरोधी आघाड्यांना तात्पुरता राजकीय लाभ दिसत असला, तरी तो फार काळ टिकणार नाही, उलट यामुळे भाजपची शक्ति अधिक वाढेल असे सांगत यादव यांनी भाजपच्या भविष्याचे आकर्षक चित्रच यावेळी उभे केले. अत्यंत संयतपणे केलेल्या या विश्लेषणात व्यक्तिगत राजकीय मते आणि अभिनिवेश टाळण्याचा यादव यांचा प्रयत्न स्पष्ट होत होता.
लोकसभा निवडणुकीत यादव यांच्या पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. स्वत यादव हेदेखील या निवडणुकीत पराभूत झाले होते. भाजपचा विजय आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या अस्ताची प्रक्रिया यांमुळे देशाच्या लोकशाही संकल्पनेसमोर नवी आव्हाने उभी राहतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर स्थापन झालेल्या आम आदमी पक्षामुळे काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारची नैतिक पत पुरती खालावली असा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत, जनतेला नेतृत्व, प्रशासन आणि विकासाचा मार्ग दाखविणारा पर्याय पाहिजे होता, अशा शब्दांत त्यांनी मोदी लाटेचे विश्लेषण केले.

Story img Loader