पंधरा वर्षे विरोधी पक्षात बसल्यानंतर सत्तेत जाण्याची संधी असूनही ती साधता येत नाही, याचे शल्य बाळगतच शिवसेनेने सकाळपासून विधानसभेत भाजपला विश्वासदर्शक ठराव मंजुरीप्रकरणी विरोध करण्यास सुरुवात केली. अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांची गाडीही विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ काही काळ अडविली, परंतु काँग्रेसने सभागृहात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यावर राज्यापालांना अडवताना केलेल्या कडवट विरोधामुळे विरोधकांच्या आक्रमकतेत शिवसनेपेक्षा काँग्रेस भारी ठरल्याचे दिसून आले.
सत्तेतून जावे लागलेली काँग्रेस एवढी आक्रमक बनेल असे वाटले नाही, असे मत भाजप व सेनेच्याही काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. भाजपने सकाळी ज्या प्रकारे आवाजी मतदानाने ‘विश्वास’दर्शक ठराव मंजूर केला व प्रत्यक्ष मतदान न घेताच विश्वासदर्शक ठराव संमत झाल्याचे अध्यक्षांनी घोषित केले तेव्हापासून काँग्रेसने प्रखर विरोध करण्यास सुरुवात केली. दुपारी राज्यपाल अभिभाषणासाठी येणार हे लक्षात घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या आमदारांनी ठिय्या मांडून सरकार व राज्यपालांच्या विरोधात घोषणा देऊन राज्यपालांना तब्बल दहा मिनिटे अडवून ठेवले. विधानभवनात येणाऱ्या राज्यपालांना व त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत काँग्रेस आक्रमक झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही या आंदोलनात सामील होते. एवढेच नव्हे तर राज्यपालांचे अभिभाषण सुरु असताना शेवटपर्यंत काँग्रेसचे आमदार राज्यपाल व सरकारच्या विरोधात घोषणा देत राहिले. काँग्रेसचे भाई जपताप, वर्षां गायकवाड, प्रणती शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी घोषणाबाजी केली. राज्यपालांची गाडी काही काळ अडवून सभागृहात गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी मात्र सभागृहात कोणताही विरोध राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावेळी केला नाही की सकाळी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी तात्काळ मतदान मागण्याची संधीही साधली नाही. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या कृतीचा समाचार घेताना यांचा ‘सामना’ सभागृहाऐवजी सभागृहाबाहेरच चालतो असा टोलाही लगावला. कामकाज पत्रिकेवर अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या ठरावानंतर विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक असा क्रमांक असतानाही अध्यक्षांनी कार्यक्रमपत्रिकेवर तिसऱ्या क्रमांवर असलेला विश्वासदर्शक ठराव घेतल्यानंतरही शिवसेनेने फारसा विरोध केला नाही.
सेनेलाच विरोधी पक्षनेतेपद
भाजप सरकारमध्ये सहभागी होणार का नाही याबाबतच्या चर्चेला बुधवारी शिवेसेनेनेच पूर्णविराम दिला. त्यानुसार या पक्षाचे गटनेते एकनाथ िशदे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. मात्र, काँग्रेसपेक्षा शिवसेनेची सदस्य संख्या जास्त असल्याने िशदे यांच्या निवडीची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली व सेनेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
सरकारकडे बहुमत; मुख्यमंत्र्यांचा दावा
’सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून ‘विरोधकांनीच योग्य वेळी मतदानाची मागणी केली नाही, त्यामुळे नियम व प्रथेनुसार आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला. आमच्याकडे बहुमत नसल्याचे ज्यांना वाटत असेल, त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करावा. त्याला सामोरे जाण्यास आम्ही अजिबात कचरणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
’१९९६ मध्ये युती सरकारच्या काळात आणि विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत आवाजी बहुमतानेच प्रस्ताव मंजूर झाला. आता जे कांगावा करीत आहेत, त्यांनी खुशाल राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे प्रतिपादनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवसेनेपेक्षा काँग्रेस भारी!
काँग्रेसने सभागृहात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यावर राज्यापालांना अडवताना केलेल्या कडवट विरोधामुळे विरोधकांच्या आक्रमकतेत शिवसनेपेक्षा काँग्रेस भारी ठरल्याचे दिसून आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-11-2014 at 02:41 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress more aggressive than sena in assembly