विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी जर काँग्रेसची मदत घ्यावी लागली तर त्यांना सोबत घेऊन सरकार बनवू. मात्र, इतर राजकीय पक्षांची मदत घेण्याचा प्रश्नच नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
विदर्भात प्रचाराच्या निमित्ताने सुप्रिया सुळे नागपुरात आल्यावर पत्रकारांशी बोलत होत्या. आघाडी कायम राहावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे आम्हाला आघाडी तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. चारही पक्ष स्वबळावर लढत असल्यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांंना संधी मिळत आहे. राज्याला महिलांना नेतृत्व मिळाले पाहिजे, हे खरे असले तरी मला मात्र केंद्रात काम करायचे आहे. उत्तरप्रदेश व दिल्ली या राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री असताना त्या त्या राज्यात महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. महिलाच महिलेला न्याय देऊ शकते. मात्र, त्यासाठी महिलांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांना निवडणुकीत स्थान दिले आहे. आघाडी तुटण्यासाठी शरद पवार यांना दोषी ठरविले जात असले तर ते चुकीचे आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सगळ्याच राजकीय पक्षांनी शरद पवार आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना लक्ष्य केले आहे. मात्र, आम्ही त्यांना उत्तर देत नाही. सरकारमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत.
स्वतंत्र विदर्भाची मागणी जनतेची नसून केवळ विदर्भातील काही पक्षातील राजकीय नेत्यांची आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिलेला असला तरी त्या पक्षातील अनेक नेते विदर्भ होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रकाश गजभिये व प्रगती पाटील उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा