राज्यात दलितांवरील वाढत्या जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजप मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर रिपब्लिकन सेना, दलित अत्याचारविरोधी कृती समिती व अन्य दलित संघटनांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व करणारे आनंदराज आंबेडकर, संघराज रुपवते, काशीनाथ निकाळजे, लेखिका उर्मिला पवार, उषा अंभोरे, सुधीर ढवळे, श्याम सोनार, सुमेध जाधव, सिद्धार्थ मोकळे यांच्यासह वेगवेळ्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करुन त्यांची विविध पोलिस ठाण्यांमघ्ये रवानगी करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा गावात दलित समाजातील आई-वडील व मुलाची क्रूर हत्या करण्यात आली. दोन आठवडय़ाचा कालावधी उलटून गेला तरी अजून आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे दलित समाजात प्रचंड असंतोष आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यभर दलित संघटनांची आंदोलने सुरू आहेत. त्याची सरकार पातळीवर कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा भाजप मंत्रिडळाच्या शपथविधी सोहळ्याकडे वळविला व आपला निषेध नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाला असतानाच मुख्य प्रवेशद्वाराजवळ आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या सुमारे २००-२५० कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर झडप घालून पोलीस व्ॅहनमध्ये कोंबून आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. वानखेडे स्टेडियमच्या बाहेर दलित अत्याचारविरोधी कृती समितीच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बंदोबस्त तोडून रस्त्यावर येणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठीचा मार खावा लागला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
दलित संघटनांची वानखेडेवर निदर्शने
राज्यात दलितांवरील वाढत्या जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजप मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर रिपब्लिकन सेना, दलित अत्याचारविरोधी कृती समिती व अन्य दलित संघटनांनी जोरदार निदर्शने केली.
First published on: 01-11-2014 at 02:48 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit groups protest outside stadium