वेळेवर भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराच्या बळावर देवेंद्र फडणविसांना पराभूत करण्याचे आदेश शिवसेना देत असली तरी, प्रत्यक्षात ते दिवास्वप्न ठरण्याची शक्यता जास्त आहे. घरभेदीच्या बळावर सेनेकडून रंगवल्या जात असलेल्या या खेळात भाजप बाजी मारण्याची शक्यता जास्त आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून रिंगणात आहेत. गेल्या वेळी सुद्धा ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते. या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करायला काही तास शिल्लक असताना भाजप-सेनेची युती तुटली. विदर्भात भाजपच्या तुलनेत कमकुवत असलेल्या शिवसेनेने युती तुटताच उमेदवार शोधमोहीम जोरात राबवली. फडणविसांच्या विरोधात सेनेला प्रबळ उमेदवार अखेपर्यंत सापडला नाही. शेवटी, पंजु तोतवानी या भाजयुमोत सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांला ऐनवेळी धनुष्यबाण हाती देण्यात आला. पंजु तोतवाणींचे भाऊ प्रकाश तोतवाणी हे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. ते माजी महापौर अनिल सोले यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सोले गडकरींचे समर्थक आहेत. फडणविसांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश तोतवाणी त्यांच्यासोबत होते. फडणविसांचा पराभव करा, असा आदेश देणाऱ्या सेनेचे हे दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे.