भाजपचे ज्येष्ठ नेते व्एकनाथ खडसे यांच्या हेलिकॉप्टरसाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर अचानक उतरवावे लागल्याची घटना पाचोरा येथे घडली.
पाचोरा मतदारसंघातील उमेदवार डॉ. उत्तम महाजन यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे गुरूवारी फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी आयटीआय मैदानाजवळ हेलिपॅड तयार करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर खडसे यांची सभा होणार होती. खडसेंच्या हेलिकॉप्टरसाटी हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक फडणवीस यांचे हेलिकॉप्टर त्या हेलिपॅडवर घिरटय़ा घालू लागले. हेलिकॉप्टरच्या हवेमुळे हेलिपॅडवर आच्छादलेला प्लास्टिकचा कागद उडून गेला. हेलिकॉप्टर उतरले. परंतु जागेवर भाजपचा एकही कार्यकर्ता किंवा पोलीस नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टरजवळ गर्दी केली. फडणवीस यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. प्राध्यापकांनी फडणवीस यांच्याभोवती कडे करत त्यांना महाविद्यालयीन कार्यालयात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा प्रकार भडगावच्या भाजप पदाधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी पाचोरा येथे धाव घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis landed over helipad reserved for eknath khadse