लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांना पराभवासाठी जबाबदार धरले जाणार नाही, याची काळजी पक्षाच्या नेत्यांनी घेतली होती. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारीही आमदार तसेच पदाधिकाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न झाल्यामुळे अस्वस्थ झालेले प्रवीण दरेकर यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला आहे. तथापि पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे दरेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे स्पष्ट केले.
मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी अंतर्गत नाराजीमधून सरचिटणीसपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला आहे. मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पराभवाची जबाबदारी आमदारांची असून त्यांनी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काम न केल्यामुळेच पक्षाचा पराभव झाल्याचे म्हटले आहे. आमदार तसेच सरचिणीस म्हणून आपण काम केले असून लोकांसाठी कामच केले नसल्याचा आरोप चुकीचा असल्याची दरेकर यांची भावना आहे. त्यामुळे अस्वस्थ दरेकरांनी सरचिटणीसपदाचा राजीनाम देत आपली नाराजी प्रकट केली.
लोकसभा निवडणुकीत कमी जागा लढण्याचा निर्णय, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय आणि त्या उलट विधानसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करण्याची भूमिका या गोष्टी तसेच पक्षबांधणी योग्य प्रकारे झाली नसल्यामुळेच मनसेला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. नाशिक महापालिकेत सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा घेतलेला पाठिंबा आणि लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणूक ताकदीनिशी लढण्याची घोषणा करून प्रत्यक्षात लढाईतून पळ काढण्याचा निर्णय राज यांनी घेतला. यामुळे मनसेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन मतदारांनी मनसेला नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेच्याच काही ज्येष्ठ पदाधिकऱ्यांचे म्हणणे आहे.
पदाधिकाऱ्यांमधील समन्वयचा अभाव आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील कार्यकर्त्यांना राज यांचे अपेक्षित असलेले थेट मार्गदर्शन न मिळाल्याचा फटका मनसेला बसल्याचे एका सरचिटणीसाने सांगितले. नांदगावकर यांच्या भूमिकेवर पक्षाचे बहुतेक आमदार नाराज असले तरी थेट बोलण्यास कोणी तयार नाही. दरेकर यांनी मात्र आमदारांनी काम न केल्याचा फटका बसल्याचा बाळा नांदगावकर यांचा आक्षेप फेटाळला असून अशा परिस्थितीत सरचिटणीसपदावर राहण्यापेक्षा राजीनामा देणे योग्य असल्याचे सांगितले.