मला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवण्याचा प्रयत्न झाल्यास दिल्लीहून मुंबईला जाण्याऐवजी थेट नागपूरला निघून जाईन, या शब्दात नितीन गडकरींनी केंद्रीय नेतृत्त्वास बजावले असून, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गडकरी नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.  
राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांबाबतच्या विविध चाचण्यांमधून भाजप हा सर्वाधिक संख्याबळ मिळवणारा पक्ष असेल, असे चित्र समोर आल्याने या पक्षात निकालाआधीच मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपला पूर्ण बहूमत मिळाले नाही तर सत्तेची कसरत सांभाळण्यासाठी अनुभवी नेते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवले जाऊ शकते, अशा चर्चेला उधाणच आले आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या गडकरींनी वरील शब्दात आपल्या भावना केंद्रीय नेतृत्त्वाजवळ व्यक्त केल्याची माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज नाव न गुप्त ठेवण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला दिली.
महाराष्ट्रात परत जाण्यास आपण अजिबात इच्छुक नाही, असे गडकरी यांनी पंतप्रधान मोदी यांनादेखील स्पष्ट शब्दात सांगितल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. दिल्लीत सक्रीय असलेल्या काही भाजप नेत्यांना गडकरी तिथे नको आहेत. त्यामुळे या निवडणूकीच्या निमित्ताने गडकरींना केंद्रातून राज्यात पाठवून देण्याची खेळी या नेत्यांकडून खेळली जात असावे, असा संशय या नेत्याने व्यक्त केला. भाजपच्या वर्तुळात संभाव्य मुख्यमंत्री म्हणून सध्या अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यात गडकरींचे नाव मुद्दाम जोडले जात आहे. तशा आशयाच्या बातम्या पेरल्या जात आहेत. पडद्यामागून खेळल्या जात असलेल्या या राजकारणाची पूर्ण कल्पना आल्यानेच गडकरींनी आता निर्वाणीची भाषा वापरल्याची माहिती या नेत्याने दिली.  गडकरी यांनी अनेकदा राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही, असे स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळातसुद्धा गडकरींनी ही बाब जाहीरपणे सांगितली होती. मतदान झाल्यावरसुद्धा त्यांनी राज्यात परत येणार नाही, असे सांगितले होते. तरीही त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत असल्याने व त्यामागे राजकारण शिजत असल्याने गडकरींनी केंद्रीय नेतृत्त्वाला स्पष्ट शब्दात सांगून टाकले आहे. या घडामोडीमुळे निकाल लागण्याआधीच भाजपमधील मुख्यमंत्री पदासाठी सुरु असलेल्या चर्चेने रंगतदार वळण घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा