मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याने नाराजी व्यक्त करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांचे प्रशस्त दालन देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मंत्र्यांची दालने आणि बंगल्यांचे वाटप हा मुद्दा नव्या सरकारमध्ये वादग्रस्त ठरला आहे. प्रत्येक मंत्र्याला चांगला बंगला आणि मंत्रालयातील दालन हवे आहे. खडसे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहाव्या मजल्यावरील दालन मिळावे, अशी लेखी मागणी केली होती. त्यानुसार सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारील प्रशस्त दालन खडसे यांना देण्यात आले आहे. मनासारखे दालन मिळाल्याने निदान खडसे यांची नाराजी दूर होईल, असा आशावाद भाजपचे नेते व्यक्त करीत आहेत.
गृह खाते मिळावे ही इच्छा विनोद तावडे यांनी व्यक्त केली होती. पण गृह खाते मिळाले नसले तरी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पहिल्या मजल्यावरील दालन पदरात पाडून तावडे यांनी तेवढीच आपली इच्छा पूर्ण केली. पंकजा मुंडे-पालवे यांना आधीच्या ग्रामविकास मंत्र्यांचे दालन देण्यात आले आहे. दालनांचे वाटप करण्यात आले असले तरी बंगल्यांच्या वाटपाचा मुद्दा अद्यापही मार्गी लागू शकलेला नाही. अजित पवार यांच्याकडील ‘देवगिरी’ आणि छगन भुजबळ यांच्याकडील ‘रामटेक’ बंगल्यांना सर्वाधिक पसंती आहे. उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य रामटेकवर होते. या बंगल्याशी आपले भावनिक नाते असल्याने हा बंगला मिळावा, अशी पंकजा मुंडे यांचीही इच्छा आहे.
परदेशी, म्हैसकर मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यालयात प्रवीण परदेशी यांची प्रधान सचिव तर मिलिंद म्हैसकर यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. प्रवीण दराडे यांची आधीच सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयाची रचना करण्याची फडणवीस यांची योजना आहे. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान कार्यालयाची माहिती करून घेण्यास सांगण्यास आले आहे. गोिवदराज यांची मदत व पुनर्वसन सचिव तर प्रवीण गेडाम यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.