शिवसेनेने ‘मिशन १५१’ पेक्षा कमी जागा लढविण्यास ठाम नकार दिल्याने आणि मुख्यमंत्रीपदाभोवती चर्चा फिरत राहिल्याने युती तुटली, असे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले. तर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती आहे. त्यामुळे युती तोडायचीच, अशा भूमिकेतून चर्चा करीत भाजपने युती तोडली, अशा शब्दांत ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी टीकास्त्र सोडले आहे. युती दोलायमान किंवा नाजूक अवस्थेत असताना काय झाले,भविष्यातील वाटचाल काय राहील, याविषयी..
युती टिकविण्यासाठी शिवसेनेने हट्टीपणाची किंवा तडजोड न करण्याची भूमिका घेतली, असा आक्षेप भाजपने घेतला आहे?
त्याग एकतर्फी होत नसतो. लोकसभेत आम्हीही जिंकलो होतो. पण केंद्रात सत्ता आल्याने महाराष्ट्रात आपली ताकद वाढली असल्याने आपल्याला ११९पेक्षा अधिक जागा हव्यात, अशी मानसिकता भाजपच्या प्रदेश नेत्यांची झाली होती. ‘आम्ही दोन पावले मागे येतो व तुम्हीपण या,’ असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी संघर्ष यात्रेत आवाहन केल्यावर आम्ही त्याचा सन्मान राखला. युती राहावी अशी प्रामाणिक इच्छा होती आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याग करण्याची भूमिका घेत १८ जागा मित्रपक्षांना दिल्या. तरीही भाजपचा १३५ जागांचा आग्रह होता. आपण कमवायचे आणि शिवसेनेला गमवायला लावायचे, अशीच त्यांची भूमिका होती. आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून १५१ मधील तीन जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी दाखविली व त्यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर लढावे, असा प्रस्ताव दिला होता. पण तोही अमान्य करण्यात आला. मित्रपक्षांना सात जागा देऊन १८ पैकी त्यांच्या ११ जागा लाटायच्या असा भाजपचाच प्रस्ताव होता. आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करतो, असे त्यांनी सुचविले होते. १९९० मध्ये युती झाली, तेव्हा भाजप १०५ आणि शिवसेना १८१ जागा लढवीत होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेकडून अधिक जागा मिळवत भाजप ११९ पर्यंत पोचला आहे.
जागावाटपाचा तिढा नेमका कशामुळे व कोणामुळे सुटू शकला नाही?
हिंदुत्वाच्या एकजुटीच्या भूमिकेतून युती झाली होती आणि देशात भाजपने सत्ता सांभाळावी व राज्यात शिवसेनेने, असे सूत्र ठरले होते. आम्ही घटकपक्षांना आधी १८ व नंतर आणखी तीन म्हणजे २१ जागा देण्याची तयारी दाखवूनही भाजप नेते हट्टाला पेटल्याने युती तुटली. संजय सावकारे, प्रशांत बंब असे काही नेते भाजपमध्ये आले व त्यांच्यासाठी भाजपला काही जागा शिवसेनेकडून हव्या होत्या. त्या आमच्या खात्रीलायक जागा होत्या. पण विकृत राजकीय आनंद मिळविण्यासाठी भाजपने त्या जागांचा आग्रह धरला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सावकारे यांना शब्द दिला होता. त्यांच्यासाठी भाजपने अनेक वर्षांची पवित्र युती तोडली. एकनाथ खडसे म्हणजे महाराष्ट्रातील नरेंद्र मोदी आहेत का?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही साटेलोटे आहे का?
भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपी युती आहे. त्यामुळेच भाजप-शिवसेना युती तुटल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही लगेच तुटली. आमच्या तडजोडी किंवा मुद्दय़ांनुसार त्यांच्यामध्येही निर्णय होत होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही निम्म्या जागांचा आग्रह धरला. खातेवाटपही भाजपची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे व शिवसेनेची खाती काँग्रेसकडे असे झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी तोडताना सरकारचा पाठिंबाही काढला आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने राष्ट्रपती राजवट आणली. सुरेश जैन यांच्यावर आरोपपत्र न ठेवता एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला खूश ठेवण्यासाठी त्यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले आहे.
गोपीनाथ मुंडे असते, तर हा तिढा निर्माण झाला असता का?
मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार, असे मुंडे यांनी अनेकदा सांगितले होते आणि शिवसेनेने कधीही त्याला आक्षेप घेतला नव्हता व त्यांना पाठिंबाच होता. पण ते गेल्याने भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. युती तोडण्याचा निर्णय म्हणजे मुंडे यांचा अवमान आहे. घटकपक्षांची स्थिती तर ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा का जाहीर केला नाही?
काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजपकडे कोणी चेहराच नसून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची यादी वाढतच चालली आहे व त्यांच्यात लाथाळ्या आहेत.
मोदी ठरवितील तो मुख्यमंत्री अशी भाजपची भूमिका आहे?
मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, असे ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना ‘केम छो’ असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाच्या यांच्या भेटीत विचारले गेल्याने निदर्शनास आले आहे. मोदी हे महाराष्ट्राचे नाहीत. त्यामुळे ते सांगतील, तो मुख्यमंत्री म्हणजे त्यांचा ‘पोपट मुख्यमंत्री’ जनतेला चालणार आहे का? दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकणारे सरकार हवे, की दिल्लीला झुकायला लावणारे स्वाभिमानी शिवसेनेचे सरकार हवे, हे जनतेने ठरवायचे आहे.
मराठी-गुजराती असा वाद शिवसेनेने निर्माण केला आहे का?
– तो वाद आम्ही केलेला नाही. मुंबईत १९९२-९३ मध्ये झालेल्या दंगलीत शिवसेनेने गुजराती बांधवांचे संरक्षण केले होते. ते पिढय़ान्पिढय़ा येथे राहतात. ते महाराष्ट्राशी एकरूप झाले आहेत. त्यांच्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही.
भाजपने आता ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ असे घोषवाक्य केले आहे?
मोदींचा शिवाजी महाराजांशी काहीच संबंध नाही. भाजपच्या प्रचाराच्या पोस्टरवर छायाचित्र मोदींचे आहे, छत्रपती शिवरायांचा संपूर्ण फोटोही छापण्यात आलेला नाही. मराठी माणूस एक वेळ आई-वडिलांना विसरेल, पण छत्रपती शिवरायांना विसरणार नाही.