विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ खडसे हे अनुभवी व ज्येष्ठ असताना मुख्यमंत्रीपदासाठी डावलले गेल्याने ते नाराज आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले, व खडसे यांची समजूत काढण्यात अखेर या नेत्यांना यश आले. विधिमंडळ नेतानिवडीच्या बैठकीत खडसे यांनीच फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सूचक म्हणून मांडला, आणि तो एकमुखाने संमत झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीमुळे आपण नाराज नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
नेतेपदी कोणाची निवड होणार, याची भाजपमध्ये आणि राजकीय वर्तुळातही प्रचंड उत्सुकता होती. राज्यातील सर्व आमदार-खासदारांना सकाळी ११ पासूनच भाजप कार्यालयात बोलाविण्यात आले होते. त्यांच्याबरोबर पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारीही होते. खडसे आपल्या निवासस्थानी होते आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे प्रदेश कार्यालयात आले होते व त्यांची चर्चाही झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, काही खासदार व आमदारांनी खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ नेते व गृहमंत्री राजनाथसिंह प्रदेश कार्यालयात येण्याच्या वेळी खडसे दाखल झाले.
खडसे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती व त्यांच्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले. खडसे हे सर्वात ज्येष्ठ असून युती सरकारच्या काळात अर्थ, उर्जा, उच्च व तंत्रशिक्षण अशा काही खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. गेली काही वर्षे ते विरोधी पक्षनेते आहेत. मात्र त्यांचे मोर्चेबांधणीचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पक्षातील नेत्यांच्या सूचनेनुसार खडसे यांनीच फडणवीस यांचे नाव नेतेपदासाठी सुचविले. खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्यास महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद हवे आहे. विधानसभा अध्यक्षपसाठीच्या नावांमध्येही त्यांचे नाव घेतले जात असल्याने ते अस्वस्थ आहेत.
अखेर नाराज खडसेच ‘सूचका’च्या भूमिकेत!
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ खडसे हे अनुभवी व ज्येष्ठ असताना मुख्यमंत्रीपदासाठी डावलले गेल्याने ते नाराज आहेत.
First published on: 29-10-2014 at 02:06 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse proposed devendra fadnavis name