वादग्रस्त ‘आयाराम’ नेत्यांवरील आरोप भाजपमध्ये येऊनही धुतले गेले नसल्याची कबुली विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तर राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
भाजपने अन्य पक्षांमधील अनेक वादग्रस्त नेत्यांना पक्षाची दारे खुली केली आणि त्यांना उमेदवारी दिली गेली. भाजप प्रवेशामुळे त्यांची कर्मे धुतली गेल्याचा दावा त्यावेळी भाजप नेत्यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही नेत्यांबाबत जनतेने जाब विचारला. त्यांच्या नावाला चिकटलेले गैरव्यवहार, भ्रष्टाचार किंवा अन्य आरोप पुसले गेले नाहीत, असे खडसे यांनी सांगितले. अशा वादग्रस्त नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे पक्षाचे धोरण चुकले का, त्यांच्याऐवजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले नसते का, असे विचारता जेथे भाजपचे सक्षम उमेदवार नाहीत, त्याच ठिकाणी अन्य पक्षांमधील उमेदवारांना प्रवेश दिला गेला आहे. त्यांचा प्रभाव संबंधित मतदारसंघात असल्याचे पाहूनच त्यांना पक्षात प्रवेश व उमेदवारी दिली गेली. त्यामुळे हे नेते निवडून येतील, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. त्याविषयी विचारता राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही समझोता किंवा साथ घेण्यात येणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या टीकेने व्यथित
राजकीय प्रतिस्पध्र्यावर टीका करताना भाजपने कधीही खालची पातळी गाठली नाही. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यापासून अनेक नेत्यांवर टीकाटिप्पणी झाली तरी हे पथ्य पाळले गेले. शिवसेनेवर टीका करायची नाही, असे आमचे धोरण होते. पण शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याबद्दल दुख आणि खेद असल्याचे खडसे यांनी सांगितले. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहायचे किंवा कसे याचा निर्णय सेनेचा असेल, असेही त्यांनी सांगितले.
मोठा भाऊ कोण हे जनताच ठरवेल!
‘शिवसेनेशी असलेल्या युतीमध्ये लहान भाऊ आणि मोठा भाऊ कोण याचा निर्णय गेली २५ वर्षे होत नव्हता. आता युती तुटल्याने जनतेच्या मतदानातूनच याचा निर्णय होईल,’ असा टोला खडसे यांनी शिवसेनेला लगावला. जिथे लग्न तुटतात तिथे राजकीय युती तुटल्याचे विशेष काय, असा सवाल करीत कोणतीही राजकीय युती आयुष्यभरासाठी नसते, असे खडसे यांनी स्पष्ट केले. युती तुटल्याने भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळाली व त्यांनी मोठय़ा उत्साहाने निवडणूक लढविली, असे सांगून खडसे म्हणाले, युती तुटल्याचे दु:ख आहे, पण त्यात विशेष नुकसान झाले नाही. ज्या ५९ जागा शिवसेनेने कधी जिंकल्या नव्हत्या, त्यापैकी आम्ही काही मागितल्या होत्या. ११९ जागा तर आम्ही अनेक वर्षे लढवतच होतो. त्या शिवसेनेने वाढवून न दिल्याने युती तुटली. मात्र त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. युतीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांनी १९९९ मध्येच युती तोडली पाहिजे, असे मला सांगितले होते. युती तोडली पाहिजे, असे मत गेली अनेक वर्षे भाजप नेत्यांमध्ये होते, असे खडसे यांनी नमूद केले.