संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, या प्रश्नाबरोबरच, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम, आर.आर.पाटील, भाजपचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आदी दिग्गजांबरोबरच, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, आदी आयाराम नेत्यांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
rv01

कराड-दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच पक्षातील बंडखोर विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी आव्हान दिले आहे. उंडाळकरांना राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे काय होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कुडाळमधून लढणारे काँग्रेसचे वजनदार नेते व मुख्यमंत्रीपदाचे काँग्रेसमधील  दावेदार नारायण राणे यांचे भवितव्यही पणाला लागले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीशी त्यांची लढत आहे. शेजारच्या कणकवली मतदारसंघात राणे यांचा मुलगा नितेश राणेही आपले राजकीय भवितव्य अजमावत आहे.  

आर.आर. पाटील उर्फ आबा यांच्यासमोर तासगाव-कवठे महंकाळमध्ये भाजपने कधी नव्हे एवढे मोठे आव्हान उभे केले आहे. आबांचे काय होणार, याबद्दलही साऱ्या महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निकालाबद्दलही सर्वत्र उत्कंठा आहे. युती तुटल्याबद्दल शिवसेनेने ज्या भाजप नेत्यांवर राग काढला, त्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, अशिष शेलार, आदींचा समावेश होता. भाजपमधील खडसे तगडे उमेदवार मानले जातात. परंतु तरीही बदललेल्या परिस्थितीत त्यांना शिवसेनेबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे खडसे यांचीही निवडणूक चर्चेत आली आहे. भाजपमधील खडसे हे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यांच्या निकालाकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.

भाजपमधील आणखी एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार विनोद तावडे यांच्या निकालाबद्दलही उत्सुकता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले बबनराव पाचपुते व डॉ. विजयकुमार गावित यांच्या भवितव्याचाही आज फैसला होणार आहे.

राज्यात २६९ ठिकाणी मतमोजणी
महाराष्ट्रातील मतमोजणी २६९ ठिकाणी २८८  केंद्रावर  मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. राज्यात भाजपने २८०, बसपाने २६०, काँग्रेस २८७, राष्ट्रवादी काँग्रेस २७८, शिवसेना २८२ आणि मनसेने २१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. तर एकूण ४११९ उमेदवार रिंगणात आहेत.

पक्षीय बलाबल – २००९
काँग्रेस – ८२, राष्ट्रवादी काँग्रेस – ६२, भाजप – ४६, शिवसेना – ४४, अपक्ष – २४, मनसे – १२, शेकाप – ४, सपा – ४, बहुजन विकास आघाडी – २, जनसुराज्यशक्ती – २, माकप – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, भारिप बहुजन महासंघ – २, लोकसंग्राम – १, स्वाभिमानी – १.

मतमोजणीसाठी २७ हजार पोलीस तैनात
मतमोजणीसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून मतदान केंद्र आणि परिसरात २७ हजार पोलीस कर्मचारी आणि २ हजार ८०० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा कवच ठेवण्यात आले आहे.   मुंबईत शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा मतदान केंद्रावर स्वतंत्रपणे मतमोजणी होणार आहे. ३६ पैकी २५ मतदारसंघ संवेदशनशील ठरविण्यात आले असून त्यादृष्टीने सुरक्षेची व्युहरचना करण्यात आली आहे.  याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आदी मिळून २ हजार ८०० पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Story img Loader