विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारीदेखील राज्यात पैशांचा पाऊस पडताना दिसला. जळगावमधील अंमळनेरमध्ये शनिवारी निवडणूक भरारी पथकाने ८० लाखांची रोकड जप्त केली. अंमळनेरच्या पाटील प्लाझा या लाँजमध्ये उतरलेल्या चार व्यक्तींकडून ही रोकड जप्त करण्यात आल्याचे समजते. हे चारही जण नंदुरबारवरून अंमळनेरमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी निवडणूक भरारी पथक आणि स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भरारी पथकाने बसमधून एका व्यक्तीला पाच लाखांच्या रकमेसह ताब्यात घेतले. हिंगणघाटमधील नांदेरी चौकातून जप्त करण्यात आलेली ही रक्कम सप्तगिरी बिल्डर्सच्या मालकीची असल्याचे समजत आहे. हिंगणघाटमधून विधानसभेसाठी उभे राहिलेले भाजप उमेदवार समीर कुणावर यांचे बंधू सप्तगिरी बिर्ल्डसमध्ये भागीदार असल्याने या पैशांचा त्यांच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संध्याकाळीदेखील नाशिकमधील सटाणा येथे बोलेरो गाडीत सात लाखांची रोकड सापडली. मात्र, अद्यापपर्यंत या पैशांचा नेमका स्त्रोत स्पष्ट झाला नसून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
विधानसभा निवडणुकांसाठी थोडाच अवधी उरला असल्याने एकूणच राजकीय समीकरणे चाचपण्यापासून उमेदवार निवडीपर्यंत तसेच बंडखोरी शमवण्यापायी राजकीय पक्षांचे काळ-काम आणि वेळेचे गणित बिघडल्याने मतदारांना येनकेनप्रकारेण आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच पक्षांचा आटापिटा सुरू आहे. अनेक मतदारसंघात पैशाचा छुपा पाऊस पडत आहे. निवडणूक आयोगाने खर्चाला मर्यादा घालून दिली असली तरी प्रत्यक्षात कोटय़वधी रुपये उडवले जातात. निवडणूक आयोगाने ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम पुराव्याशिवाय नेण्यास बंदी घातली आहे. पण या काळ्या पैशांची देवाणघेवाण चोरटय़ा मार्गाने होत असते. संपूर्ण राज्यभर नाकाबंदी लावली असून तपासणीच्या वेळी मोठी रक्कम सापडून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही कोटय़वधी रुपयांची रोकड संपूर्ण राज्यात सापडली होती. त्यानंतर मुंबई आणि राज्यभरात पुन्हा नोटा सापडण्याचे सत्र सुरू झाले आहे.
जळगाव आणि वर्ध्यामध्ये ८५ लाखांची रोकड जप्त
जळगावमधील अंमळनेरमध्ये शनिवारी निवडणूक भरारी पथकाने ८० लाखांची रोकड जप्त केली. अंमळनेरमधील पाटील प्लाझा या लाँजमध्ये उतरलेल्या चार व्यक्तींकडून ही रोकड जप्त करण्यात आल्याचे समजते.
First published on: 11-10-2014 at 12:22 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election team seized 80 lakhs in jalgaon