राज्यात ६०च्या आसपास आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाला स्वबळावर लढताना प्रथमच कमी जागा मिळाल्या आहेत. राज्याच्या राजकारणावर गेली तीन दशके पगडा असलेल्या पवार यांची ताकद घटू लागल्याचे मानले जाते.  सारी ताकद लावूनही राष्ट्रवादीला चाळीशीचे संख्याबळ गाठणे कसेबसेच शक्य झाले. पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. डिसेंबर महिन्यात ७५ वर्षांंत पदार्पण करणाऱ्या शरद पवार यांनी आतापर्यंत चार वेळा राज्य विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविली. चार निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वात कमी आमदार निवडून आले आहेत. १९८० मध्ये पवार यांच्या नेतृत्वाखाली अर्स काँग्रेसने निवडणूक लढविली तेव्हा ४७ आमदार निवडून आले होते. १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसला ५४ आमदार निवडून आले होते. १९९९ मध्ये पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा ५८ आमदार निवडून आणले होते. या वेळी स्वबळावर लढताना राष्ट्रवादीने चाळीशी पार केली.
१९८०च्या दशकपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांचे प्रस्थ वाढले तशी शरद पवार यांची पक्षावरील पकड कमी होत गेली. सिंचन घोटाळ्यावरून आरोप होताच अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता पक्ष आपल्या इशाऱ्यानुसार चालतो हे पवार यांना सूचित करावे लागले होते. अजित पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्याने पक्षात जुने विरुद्ध नवे असा वाद सुरू झाला. यामुळेच अलीकडच्या काळात पक्षाच्या कारभारात स्वत: पवार यांनी लक्ष घातले होते.
१९९०च्या दशकात मुख्यमंत्रीपदी असताना शरद पवार यांच्यावर भूखंड घोटाळा, गुन्हेगारांशी संबंध यासारखे आरोप झाले होते. १९९५च्या निवडणुकीत त्याचा पवार आणि काँग्रेसला फटका बसला होता. यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव जोडले गेले होते. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला होता. हे सारे घटक राष्ट्रवादीच्या विरोधात गेले.
गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला राज्यभर पाया विस्तारता आला नाही.

Story img Loader