२३ लाखांच्या लाच प्रकरणात माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या कफ परेड येथील सरकारी बंगल्यावर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकल्यानंतर आढळलेल्या चारपैकी दोन फाईलींवर सही केल्याचे आढळून आले आहे. याशिवाय लाच प्रकरणातील मूळ आदेशाची प्रतही बंगल्यावर आढळल्यामुळे संशयाची सुई माजी महसूलमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे. या प्रकरणी धस यांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.
धस यांचे सहाय्यक वैभव आंधळे याच्यासह महसूल खात्यातील कक्ष अधिकारी संजय सुराडकर तसेच त्यांचे स्वीय सहायक देवीदास दहिफळे या तिघांना २३ लाखांची लाच घेताना अटक झाली. आंधळे यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात महसूल विभागाशी संबंधित ८४ फायली सापडल्या. या सर्व फायलींची तपासणी केली जात असून यापैकी काही फायली महसूल विभागाशी संबंधित आहेत. २३ वर्षांच्या आंधळे याच्या मालकीची वेर्ना कार, दोन आयफोन आणि कुर्ला येथे फ्लॅट आहे. इतक्या कमी वयात इतकी माया गोळा करणाऱ्या आंधळे याच्या उत्पन्नाचा स्रोत तपासला जात असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. आंधळे याच्या दोन्ही आयफोनवरील नोंदी तपासल्या जात असून संबंधित माजी मंत्री आणि आंधळे हे संपर्कात होते का, हे स्पष्ट होणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. याशिवाय दिल्लीतील एका डॉक्टरचाही मध्यस्थ म्हणून सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याही फोनच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आंधळे याच्याशी आपला संपर्क नसल्याचा दावा धस यांनी केला असला तरी प्रत्यक्ष संपर्कासाठी दुसऱ्या फोनचा वापर केला गेला असावा, असा संशय लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
धस यांच्याकडे सापडलेल्या फायलींबाबत सध्या तपास सुरू आहे. पुण्यातील एका मंदिराच्या १८ एकर भूखंडाबाबत अनुकूल आदेश देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या आदेशाची मूळ प्रत धस यांच्या बंगल्यावर आढळल्यामुळे ते गोत्यात येण्याची शक्यता असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. धस यांनी फाईल घरी नेऊन गोपनीयतेचा भंग केला का, याबाबत कायदेशीर मत अजमावले जात आहे. मात्र या प्रकरणात सकृद्दर्शनी धस यांचा संबंध असल्याचे दिसत असल्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलाविले जाईल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
धस यांच्या कफ परेड येथील बंगल्यावर चार दिवसांपूर्वी छापा टाकण्यात आला. त्यात सापडलेल्या फाईलींची तपासणी सुरू आहे. या लाच प्रकरणात धस यांचा संबंध आहे का, याचा तपास अद्याप सुरू आहे.
प्रवीण दीक्षित
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक