शिवसेनेने विरोधात मतदान करण्याचे जाहीर केल्याने भाजपसमोर बहुमताचे गणित सिद्ध करण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने भाजपचे नेते निश्िंचत होते. प्रत्यक्ष मतदान झाले असते तर राष्ट्रवादीने सरकारच्या बाजूने मतदान करणे वा तटस्थ राहून मदत करणे हे भाजपसाठी अडचणीचे ठरणार होते. यातूनच विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करीत भाजपने मतदान टाळले आणि स्वत:ची सुटका करून घेतली.
विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया पार पडल्यावर कार्यक्रम पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा विषय होता. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर विरोधी पक्षनेत्याचा विषय हाती घेऊ, असे नव्या अध्यक्षांनी जाहीर करताच शिवसेनेने त्याला आक्षेप घेतला आणि सभात्याग करण्यास सुरुवात केली. तेवढय़ात भाजपचे आशीष शेलार यांनी ‘हे सभागृह देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करीत आहे’ असा एका ओळीचा ठराव वाचला. ‘होय, मंजूर’ असे भाजपचे सदस्य जोरात ओरडले. सत्ताधारी बाकांवरून ‘मंजूर’ असा गलका झाल्यावर अध्यक्ष बागडे यांनी ‘होयचे बहुमत, प्रस्ताव मंजूर’, असे जाहीर केले. तोपर्यंत शिवसेना आणि काँग्रेस सदस्यांना सभागृहात काय चालले याचा अंदाजच आला नाही. ठरावावर मतदान घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील करीत होते. मात्र, विरोधी बाकांवरून विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची मागणीच करण्यात आली नाही. यामुळे आपण विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा केली, असा दावा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला.
विधिमंडळाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असे वर्णन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असून नैतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपने रिंगणातून पळ काढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा