पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा गवगवा अनाकलनीय आहे. गांधींचे नाव घ्यायचा अधिकार सर्वानाच आहे. पण मोदींनी पहिल्यांदा नथुराम गोडसेचा संघाच्या व्यासपीठावरून निषेध करावा आणि मगच गांधींचे नाव घ्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी शनिवारी दिले.
आर. आर. पाटील निवडणूक लढवत असलेल्या तासगाव येथे आज, रविवारी मोदी यांची सभा होत आहे. त्या सभेच्या पूर्वसंध्येला, जाखापूर गावामध्ये घेतलेल्या प्रचारसभेत आर. आर. पाटील यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ‘संघ किंवा भाजप यांचे गांधींबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे,’ असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामांचे कौतुक केले होते. तसेच ‘सरकारच्या हाती जादूची कांडी नाही’ असे सांगून सरकारचा बचावही केला होता. त्यावर आर. आर. पाटील म्हणाले, ‘जादूची कांडी नव्हती, तर मग सत्तेत आल्यावर तातडीने बदल करून दाखवू, असे आश्वासन मोदींनी का दिले होते. ते सत्तेत आल्यापासून जातीयवादी नेते आणि कार्यकत्रे यांची िहमत वाढली आहे आणि दंगलींची संख्याही वाढलीये. जादूची कांडी नसली, तरी परवडली पण त्यांच्या हातातील संघाची काठी देशाच्या एकात्मतेला घातक आहे.’
‘स्वच्छता अभियान’ महाराष्ट्राचेच
‘महाराष्ट्रात ज्या योजना माझ्या पुढाकाराने सुरू झाल्या, त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा समावेश होतो. १५ वर्षांपूर्वी राज्यात सुरू केलेले हे अभियान आजही सुरू आहे. दर वर्षी दोन ऑक्टोबरला हे अभियान राज्यात राबविले जाते. आज हेच अभियान केंद्र सरकारने सुरू केले. महाराष्ट्राची आणखी एक योजना केंद्राने स्वीकारली,’ असेही आर. आर. म्हणाले.
प्रचाराच्या तोफा
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे काम
नरेंद्र मोदी करीत असून १०५ हुतात्मे देऊन निर्माण झालेला महाराष्ट्र हे कदापिही सहन करणार नाही.
– नारायण राणे, सांगलीतील सभेत

सत्ताधारी मंडळी स्वत:च्या पदामुळे तृप्त होत नाहीत. आपल्या पुढच्या पिढीची बेगमी करतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना स्वतंत्र लढत असले तरी आतून सगळे एक आहेत.
– राज ठाकरे, निलंग्यातील सभेत

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी जर काँग्रेसची मदत घ्यावी लागली तर त्यांना सोबत घेऊन सरकार बनवू, मात्र इतर  पक्षांची मदत घेण्याचा प्रश्नच नाही.
– सुप्रिया सुळे, नागपुरात बोलताना

अच्छे दिन येणार आहेत, असे सांगण्यात आले व त्या भरवशावर तुम्ही मतदान केले. मग आता अच्छे दिन आले आहेत काय? आम्ही केंद्रात मोदींची सत्ता यावी म्हणून मते मागितली; पण आता मोदी शिवसेनेसाठी मते मागत नाहीत, हे दुर्दैवच आहे.
उद्धव ठाकरे, अकोला येथील सभेत

Story img Loader