मित्रांच्या सोबतीत रंगणारा देवेंद्र फडणवीस त्यांच्या मृत्यूनेही तेवढाच हळवा होत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. शाळेतला आमचा मित्र देवेंद्र आज मुख्यमंत्री झाल्यानंतरही आमच्याशी तसाच संवाद साधणार, याची आम्हाला खात्री आहे. सर्वाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या या मित्राकडून आम्हाला राजकीय अपेक्षा नाहीत, असे भावी मुख्यमंत्र्यांच्या मित्रांनी म्हटले आहे.
देवेंद्रचा मुख्यमंत्री म्हणून होणारा शपथविधी वानखेडे स्टेडियमच्या कोपऱ्यातून अनुभवणार आहोत, हे सांगताना मोहन मते, महेश रामडोहकर, उमेश रामडोहकर, हर्षल आर्विकर, प्रवीण बन्सोड, उदय डबले, शैलेश जोगळेकर, संजय जोशी या त्याच्या बालपणीच्या मित्रांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी तरळले. देवेंद विजय सुपर ही दुचाकी चालवायचा आणि मी त्याच्यामागे बसायचो. चारचाकी वाहने दोघांकडेही आली, पण प्रवास थांबला नाही तर गडद झाला, अशी भावना अ‍ॅड. उदय डबले यांनी व्यक्त केली.
देवेंद्रने आम्हा सातही मित्रांना उद्योग व्यवसायात प्रचंड प्रोत्साहन आणि आर्थिक मदतही केली. दुर्दैवाने आम्ही व्यवसायात अयशस्वी ठरलो, पण त्या संकटातून त्याने आम्हाला वाचवले. वाईट प्रसंगात पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही त्याची खासियत असल्याचे शैलेश जोगळेकर याने सांगितले. दीड-दोन वर्षांपूर्वी त्यांचे मित्र मोहन जावडेकर यांचा अपघाती मृत्यू चटका लावून गेला. त्यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यापासून अस्थिविसर्जनापर्यंतची प्रत्येक जबाबदारी फडणवीसांनी पार पाडल्याची आठवणही देवेंद्र यांच्या मित्रांनी सांगितली.