केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या वृत्ताला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दुजोरा दिला.‘ पक्षाने याबाबत विचारणा केली असून, मी दिल्लीत जाण्यास फारसा उत्सुक नाही. देशाला माझ्या सेवेची गरज असल्याने हे आव्हान स्वीकारले आहे’. असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी सकाळी माझ्याशी चर्चा करून पंतप्रधानांनी दिलेली नवी जबाबदारी स्वीकारण्याची सूचना केली, मात्र ही जबाबदारी काय असेल हे त्यांनी उघड केले नाही. गोव्याबद्दल जिव्हाळा असल्याने राज्याबाहेर जाणे अवघडल्यासारखे वाटते. मात्र देशाला माझ्या सेवेची गरज आहे हे माझे अंतर्मन सांगते, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. गोव्यातील जनतेने मला पाच वर्षांसाठी कौल दिला आहे, त्यामुळे राज्याबाहेर जाऊ नये असे वाटते. मात्र आता पंतप्रधानांकडून प्रस्ताव आला आहे. भाजपच्या आमदारांची शुक्रवारी चर्चा करणार असून त्यांना या घडामोडींची माहिती देणार आहे. मात्र गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. नवा मुख्यमंत्री निवडताना अनेक बाबी विचारात घेतल्या जातील, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. ८ तारखेला पर्रिकर राजीनामा देतील, असे गोवा भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले. शनिवारी भाजपचे संसदीय मंडळ नव्या नेत्याची निवड जाहीर करेल. सकाळी १० वाजता संसदीय मंडळाची बैठक होत आहे. १२ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यामध्ये शिक्कामोर्तब होईल. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक मुख्यमंत्री होण्याची शक्यता पर्रिकर यांनी फेटाळून लावली. ४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेत भाजपला बहुमत आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी पार्सेकर आर्लेकर यांच्या नावांची चर्चा
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल हे स्पष्ट झाल्यावर आता गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाश्र्वभूमी असलेल्या या दोन्ही नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही भूषवले आहे. पक्षाचा आदेश आपल्याला शिरोधार्य असेल, मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत मी नाही, अशी प्रतिक्रिया पार्सेकर यांनी दिली. तर याबाबत मला कुणीच काही माहिती दिलेली नाही, असे आर्लेकर यांनी सांगितले. पक्षाने जबाबदारी दिली तर मी सक्षमपणे हाताळेन, असे त्यांनी सांगितले. पर्रिकर यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांनी राज्यात भाजपची उभारणी केली. आर्लेकर हे पेर्णे मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर पार्सेकर हे उत्तर गोव्यातील मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी मंत्रिपद?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे. किमान सहा नव्या चेहऱ्यांचा यामध्ये समावेश होऊ शकतो, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना व तेलुगू देशम यांनाही संधी दिली जाईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.मनोहर पर्रिकर यांच्या खेरीज मुख्तार अब्बास नक्वी, तसेच भाजयुमोचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना स्थान मिळेल अशी चिन्हे आहेत. दोन दिवसांत तुम्हाला सर्व काही समजेल, असे तेलुगू देशमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. बिहार व राजस्थानमधूनही काही जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल या नेत्यांकडे अनेक खाती आहेत. त्यामुळे ही खाती इतरांकडे देण्याचा प्रयत्न या विस्तारात होईल, अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा