राष्ट्रवादीबरोबरील आघाडी तुटल्याचे आमच्या फायदेशीरच ठरले असून, गतवेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, आणि पक्षाला बहुमत मिळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी केला.
काँग्रेससोबतची आघाडी तोडण्याचा चांगला निर्णय राष्ट्रवादीने घेतला. कारण आघाडी असली तरी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते बहुतांशी मतदारसंघांमध्ये आपली मते काँग्रेसच्या बाजूने हस्तांतरित करण्याऐवजी विरोधकांना मिळतील, अशी व्यवस्था करीत. परिणामी काँग्रेसच्या उमेदवारांचे नुकसानच होत असे, असा खोचक टोला मारून ठाकरे म्हणाले की आता वेगळे लढत असल्याने काँग्रेसच्या पथ्थ्यावरच पडणार असून, काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी हा भाजप आणि शिवसेना आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीही प्रतिस्पर्धी आहे. निकालानंतर पुन्हा राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची शक्यता ठाकरे यांनी फेटाळून लावली. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ. आम्हाला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात एवढय़ा सभा का घ्याव्या लागतात. कारण भाजपची राज्यभर लढण्याची ताकदच नाही. मोदी यांच्या सभांना गर्दी झाली तरी मतांसाठी गर्दी हा निकष नसतो, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. देशाचे तुकडे झाले तरी चालतील पण आपला कार्यक्रम राबविण्यावर रा. स्व. संघ आणि भाजपचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.

Story img Loader