मोदी लाटेने देशात काँग्रेसचा पुरता धुव्वा उडवला असताना, हिंगोलीत मात्र शिवसेनेच्या विद्यमान खासदाराला पराभूत करून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी काँग्रेसची लाज राखली. महाराष्ट्रात नांदेड व हिंगोली या केवळ दोनच जागा काँग्रेसला जिंकता आल्या. लोकसभेतील हा करिष्मा विधानसभेच्या रणमैदानात राखण्याचे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर आहे. जिल्ह्य़ात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. तिन्ही जागा आघाडीकडे आहेत. शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्याने या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांबाबत उत्सुकता असेल.
लोकसभेच्या निकालाशी विधानसभेच्या मैदानाचा मेळ साधताना पूर्वेतिहास नजरेआड करता येणार नाही. गेल्या लोकसभेत (२००९) विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघांत शिवसेना खासदार सुभाष वानखेडे यांनी मोठी आघाडी घेतली होती. परंतु, त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीने तिन्ही जागा जिंकल्या होत्या. आघाडीतील सूत्रानुसार िहगोली व कळमनुरी काँग्रेसकडे, तर वसमत राष्ट्रवादीकडे आहे. महायुती अस्तित्वात असताना कळमनुरी, वसमत शिवसेनेकडे, तर िहगोली भाजपकडे असे पूर्वीचे सूत्र होते.
लोकसभेच्या मैदानात काँग्रेसच्या सातव यांनी महायुतीचे वानखेडे यांचा पराभव केला. सेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व कळमनुरीचे गजाननराव घुगे यांनी सातवांना मदत केल्याचा आरोप शिवसनिकांमधून केला जातो. सेना नेत्यांच्या साक्षीने रंगलेल्या सेनेअंतर्गत वादातून मुंदडा यांचा पुतळा जाळण्यात आला. या निमित्ताने अनेक शिवसनिकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. याचे पडसाद विधानसभेच्या मैदानात उमटतील, असे चित्र आहे.
हिंगोली
सलग तीन वेळा विजयी झालेल्या आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव गोरेगावकर यांनी प्रत्येक वेळी या ना त्या पक्षाकडून उमेदवारी केली. काँग्रेसला विरोधकांपेक्षा आघाडीतील स्वकीयांचा सामना करावा लागतो. िहगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण हेही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचे ते कट्टर समर्थक. आघाडीचे सूत जुळले नाही तरी चव्हाण निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा समर्थकांचा त्यांना आग्रह आहे.
वसमत
राष्ट्रवादीचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर दोन वेळा येथून विजयी झाले. गेल्या निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी सेनेचे डॉ. मुंदडा यांचा त्यांनी पराभव केला. दांडेगावकर यांनी उमेदवारी निश्चित मानून प्रचाराला सुरुवात केली. लोकसभेत मुंदडा गटाने विरोधात काम केल्याचा आरोप वानखेडेसमर्थक करीत असल्याने सेनेत दोन गट पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ शिवाजीराव जाधव यांना सेनेकडून उमेदवारीची अपेक्षा असून त्यांचा तसा प्रयत्न सुरू आहे.
कळमनुरी
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा या जागेवर दावा आहे. सातव खासदार झाल्याने येथे काँग्रेसकडे इच्छुकांची स्पर्धा सुरू झाली आहे. माजी खासदार शिवाजी माने ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. सातव यांच्या विरोधात माने यांनी सेनेचा उघड प्रचार केला. त्यामुळे सातव यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. सातव कोणासाठी शब्द टाकतात, याची उत्सुकता आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावई डॉ. संतोष टारफे, दिलीप देसाई, संतोष बोंढारे, अ‍ॅड. बाबा नाईक आदी इच्छुक आहेत. सेनेकडून माजी आमदार गजाननराव घुगे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, डॉ. वसंतराव देशमुख आदींच्या नावांची चर्चा आहे. लोकसभेत सेनेच्या वानखेडेंविरुद्ध घुगे यांनी काम केल्याचा आरोप वानखेडेसमर्थक करतात. त्यामुळे सेनेतच उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा