नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरबा खेळण्याच्या ठिकाणी मुस्लिम तरुणांना सहभागी होऊ देऊ नका, असा सल्ला मध्य प्रदेशातील एका महिला आमदाराने दिला आहे.
मुस्लिम युवक गरब्याच्या निमित्ताने हिंदू मुलींच्या संपर्कात येऊन त्यांना फसवतात आणि धर्मांतर करवून मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या वाढवतात असे वादग्रस्त विधान भाजपच्या मध्यप्रदेशातील उपाध्यक्ष आणि आमदार ऊषा ठाकूर यांनी केले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी सर्व गरबा आयोजकांना या संदर्भात पत्र लिहून गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदू युवकांनाच परवानगी द्यावी असे कळविणार आहे. तसेच सर्वांना आपले ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक असावे, जेणे करून गैरप्रकारांना आपोआप आळा बसेल.”
तसेच जर मुस्लिम तरुणांना गरब्यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना आधी धर्म बदलून हिंदू व्हावे लागेल, तसे ओळखपत्र असल्यासच त्यांना परवानगी देण्यात यावी, असेही ऊषा ठाकूर म्हणाल्या.
अनेकदा ते (मुस्लिम) कपाळाला टीळा लावून येतात त्यामुळे ते हिंदू असल्याचा गैरसमज निर्माण होतो आणि मुस्लिम युवक तरुणींशी मैत्री करतात. मात्र, ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केल्यास प्रत्येकाची खरी ओळख पटण्यास मदत होईल असे ठाकूर यांनी सांगितले.  ठाकूर यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Story img Loader