राजकारणात कुणीही अस्पृश्य नसते असे सांगत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात लढण्यासाठी डाव्या पक्षांशी आघाडीबाबत संकेत दिले होते. डाव्या पक्षांनी मात्र तृणमूल काँग्रेसशी आघाडी होणार नसल्याचे सांगत हा प्रस्तावच धुडकावला आहे.
एका मुलाखतीत ममतांना बिहारमधील संयुक्त जनता आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी पश्चिम बंगालमध्ये अशी परिस्थिती आलीच तर विचार केला जाईल, असे सांगत आघाडीसाठी पर्याय खुला असल्याचे सुचवले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी करणार काय, असा थेट प्रश्नच विचारल्यावर प्रस्ताव आला तर पक्षात चर्चा करू असे स्पष्ट केले होते. डाव्या पक्षांना मात्र ममतांचा प्रस्ताव अमान्य आहे.
ममतांच्या धोरणामुळे राज्यात भाजपचा शिरकाव झाला. जातीय शक्तींशी स्वबळावर संघर्ष करण्याइतके आम्ही सक्षम आहोत असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी स्पष्ट केले. १९९८ मध्ये ममतांनी प्रथम भाजपशी आघाडी करून बंगालमध्ये त्यांचा प्रवेश सुकर केला असा आरोप माकपच्या पॉलीट ब्युरोचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते सुर्यकांत मिश्रा यांनी केला. ममतांच्या अनुनयाच्या धोरणामुळे राज्यात जातीय शक्ती वाढत असल्याचा आरोप क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे राज्य सरचिटणीस किश्ती गोस्वामी यांनी केला. फॉरवर्ड ब्लॉकने देखील तृणमूल काँग्रेसशी युती शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘ही भाजपच्या प्रभावाची कबुली’
ममतांनी डाव्याशी आघाडीबाबत उत्सुकता दाखवणे म्हणजे राज्यात भाजपचा प्रभाव वाढत असल्याची कबुलीच दिली आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. भाजपची ताकद वाढत असल्याने ममता अस्वस्थ असून, त्यांची धोरणे पाहता पुढील निवडणुकीत त्यांना विजय कठीण आहे, असा दावा भाजपचे चिटणीस सिद्धार्थनाथ सिंह यांनी केला.
तृणमूलशी आघाडीला डाव्या पक्षांचा नकार
राजकारणात कुणीही अस्पृश्य नसते असे सांगत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात लढण्यासाठी डाव्या पक्षांशी आघाडीबाबत संकेत दिले होते.
First published on: 31-08-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left deny to join hands with mamata