राज्यातील लक्षवेधी निवडणुकीचे निकाल दाखविण्यासाठी मद्यशाला, फार्महाऊस, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिग सज्ज झाली असून मित्रमंडळींसह एकत्रित निकाल पाहण्यासाठी रविवारी ड्राय डे असल्याने अनेकांनी शनिवारीच मद्याचा स्टॉक घेऊन ठेवला आहे. या सर्वपक्षीय पाटर्य़ामध्ये उमेदवार जिंकले किंवा हरले तरी जोरात दारूकाम होणार आहे.
दुपापर्यंत २८८ मतदारसंघांचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील निकालाबरोबरच आपला आमदार कोण होणार, हे चित्र पाहण्याची उत्सुकता मोठी आहे.
 राज्य आणि स्थानिक पातळीवर मित्रमंडळींत फार मोठय़ा पैजा लागल्या असून सट्टेबाजार तेजीत आहे. त्यामुळे जर-तरची चर्चा करण्यासाठी अनेकांनी सामूहिक पाटर्य़ाचे बेत आखले असून लोणावळा, खंडाळामधील बंगले व कर्जत, पनवेलमधील फार्महाऊसना महत्त्व आले आहे. त्यासाठी अनेकांनी शनिवारी रात्री या मुक्कामाकडे कूच केली असून मद्य व मांसाहाराचा स्टॉक नेण्यात आला आहे. पनवेलच्या दुंदरे, रिटघर, हरिग्राम भागात साठपेक्षा जास्त फार्महाऊस फुल्ल झाले आहेत. उद्या पनवेलमध्ये येणाऱ्या फार्महाऊसच्या मालकांच्या मित्रमंडळींची संख्या जास्त असणार, असे रिटघरचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोपी यांनी सांगितले.
काही फार्महाऊसवर मोठय़ा टीव्ही स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. फार्महाऊसबरोबरच अनेक हॉटेल्सनी संध्याकाळी हॉटेल्समध्ये ग्रुपमध्ये येणाऱ्या तळीरामांसाठी वेगळ्या बैठकीचा व्यवस्था केली आहे, असल्याचे ऐरोलीतील साईनिधी हॉटेल्सचे व्यवस्थापकीय     सदाशिव शेट्टी यांनी सांगितले. काही हॉटेल्समध्ये एकावर एक ड्रिंक फ्री सुविधा ठेवण्यात आली आहे. काही मित्रांनी लॉजिंग बोर्डिगमध्येच मद्य, जुगार आणि टीव्हीचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही जणांनी आपल्या घरातच मित्रमंडळींसह निवडणूक उत्सवाचा आनंद घेण्याचे ठरविले आहे.