शिवसेना-भाजप यांच्यात काडीमोड झाल्यास, युतीच नव्हे तर नव्याने जन्माला आलेली महायुतीही तुटणार आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षही आपआपले पर्याय अजमावू लागले आहेत. युती तुटलीच तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांची वेगळी आघाडी उभी करण्याचे संकेत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले. विधानसभेच्या १२५ जागा लढविण्याची रासपने तयारी केली आहे.
सेना-भाजप यांच्यातच जागावाटपावरुन वाद सुरू आहे. अन्य घटक पक्षांचा विचार केला जात नाही. अमूक इतक्या जागा लहान पक्षांना सोडण्याबाबत दोन्ही पक्षांतील नेते सांगतात, परंतु कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार किंवा आमची मागणी काय आहे, त्यावर काहीही भाष्य केले जात नाही. त्यामुळे युती राहावी ही आमची इच्छा असली तरी, आणखी एखादा दिवस वाट बघू, अन्यथा आम्हालाही वेगळ्या राजकीय पर्यायाचा विचार करावा लागेल, असा पवित्रा जानकर यांनी घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी, महायुती टिकण्यासाठी विशिष्ट जागांचा आग्रह सोडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र जानकर दोन मोठय़ा पक्षांच्या भांडणात लहान पक्षांचे नुकसान सहन करायला तयार नाहीत. शेट्टी यांच्या पक्षाशी युती करून निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार आहे.

 

Story img Loader