रिपब्लिकन पक्षासाठी भाजपने ८ जागा सोडल्या असल्या तरी पाच ठिकाणी भाजपचेही उमेदवार असल्याने तेथे भाजप व रिपब्लिकन पक्षात लढत होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्येच केवळ भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतला व अन्य ठिकाणी घेतले नाहीत. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षात नाराजी आहे. भाजपने जागा दिल्या, तरी त्यांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे आदेश का दिले व ते मागे घेण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंतप्रधानांची ४ ऑक्टोबरला सभा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ ऑक्टोबरला मुंबईत येत असून महालक्ष्मी रेसकोर्सवर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यादिवशी कोल्हापूर व आणखी एखाद्या ठिकाणी सभा आयोजित करण्याचे प्रयत्न आहेत. मोदी यांच्या राज्यात २० ते २५ सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक अधिक गांभीर्याने घेण्यात आली असून मोदी सर्वाधिक वेळ राज्यात सभा घेण्यासाठी देणार आहेत.
रणजित देशमुख यांचा पक्षत्याग
नागपूर : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून होत नसलेला सन्मान आणि पक्षातील भोंगळ कारभाराने वैतागून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून रणजित देशमुख पक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज असताना त्यांनी पक्षश्रेष्ठींशी यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, त्यांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पत्राद्वारे राजीनामा पाठविला. आशिष आणि अमोल हे दोन्ही चिरंजीव विधानसभा निवडणुकीत रिंगणात आहे. त्यात आशिष काटोल मतदारसंघातून भाजपकडून तर अमोल हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित असल्यामुळे माझ्यासमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. दुसऱ्या पक्षात जाण्याचा सध्या तरी विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीरामपूरमध्ये २१ उमेदवारांची माघार
श्रीरामपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन चळवळीतील उमेदवार उभा राहिला तर होणारी मतविभागणी टाळण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी विशेष मोहीम राबविली. त्यामुळे २१ इच्छुकांनी अर्ज स्वत:हून मागे घेत रिपब्लिकन चळवळीच्या ऐक्यावर शिक्कामोर्तब केले. आपली ताकद दाखवून देण्याकरिता पक्ष, गटतट याला भीक न घालता एकत्रितपणे प्रथमच अशी मोहीम राबविली. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा २००९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता या समाजाला निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जात नाही. त्यामुळे समाजात असंतोष होता.
जयंत पाटीलांविरोधात विरोधक एकवटले
सांगली : जयंत पाटील यांची राजकीय कोंडी करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याचे विरोधकांचे प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी ठरले. शिवसेनेचे भीमराव माने आणि प्रमुख विरोधक अपक्ष नानासाहेब महाडिक यांनी माघार घेतली असली, तरी जयंत पाटील यांच्या विरुद्ध पाच प्रमुख उमेदवारांसह १३ जण िरगणात उरले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा जिल्ह्य़ातील अन्य मतदार संघांमधील हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांच्याच इस्लामपूर मतदार संघामध्ये कडवे आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी प्रतीक पाटील आणि खा. राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला.
पाच ठिकाणी भाजप विरुद्ध रिपाइं
रिपब्लिकन पक्षासाठी भाजपने ८ जागा सोडल्या असल्या तरी पाच ठिकाणी भाजपचेही उमेदवार असल्याने तेथे भाजप व रिपब्लिकन पक्षात लढत होणार आहे.
First published on: 02-10-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election randhumali