सुमारे साडेआठ कोटी मतदार असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी किंवा युतीचे चित्र अद्याप अधांतरी असले तरी निवडणुकीची अधिसूचना उद्या जारी होणार असून, त्याद्वारे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून २७ तारखेपर्यंत सुरू राहील. जनतेला अंधश्रद्धेच्या विरोधात धडे देणाऱ्या बहुतांशी राजकीय नेत्यांचा मनावर शुभ-अशुभाच्या समजुतींचा पगडा आहे. २४ तारखेपर्यंत पितृपक्ष असल्याने शक्यतो या काळात उमेदवारी अर्ज भरले जाणार नाहीत. अगदी सत्याला स्मरून शपथ घेणारे अजित पवार यांच्यासारखे अनेक नेतेही या काळात अर्ज भरणार नाहीत. २५ तारखेला घटस्थापना असून, पुढील गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता झुंबड उडेल, अशी शक्यता आहे.
२९ तारखेला अर्जांची छाननी होईल व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ ऑक्टोबपर्यंत आहे. १५ ऑक्टोबरला मतदान असल्याने प्रचाराची सांगता १३ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता होईल. प्रचाराला दोन आठवडे उमेदवारांना उपलब्ध होणार आहेत. मतमोजणी १९ ऑक्टोबरला होणार असून, १४४ हा जादुई आकडा सहजपणे गाठला गेल्यास दिवाळीपूर्वीच नवे सरकार विराजमान होऊ शकेल.
उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या राज्यातील चारही प्रमुख पक्षांमध्ये अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी किंवा महायुतीचा अद्याप निर्णयच झालेला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली नाही.
रविवार-सोमवारनंतरच सारे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, भाजप जसे पक्ष, तसाच ‘पितृपक्ष’ – भुजबळ
पितृपक्ष असल्याने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अथवा अर्ज दाखल करण्यास राष्ट्रवादीकडून मुद्दामहून विलंब करण्यात येत आहे का, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला असता त्यांनी, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांसारखाच पितृपक्ष असल्याची कोटी केली. सारेच नेते पितृपंधरवडा एकदाचा सरू दे, मगच अर्ज भरू, या मताचे आहेत.
१३ मतदारसंघांमध्ये नवा प्रयोग
मतदान केल्यावर ते कोणाला केले याची पडताळणी करण्याची सुविधा १३ मतदारसंघांमध्ये उपलब्ध होणार आहे. यंत्रावरील कळ दाबल्यावर शेजारी ठेवण्यात आलेल्या डब्यात कोणाला मतदान केले हे मतदारांना बघणे शक्य होईल. मात्र तो कागद (स्लिप) गुप्त राहिल. हा प्रयोग औरंगाबाद आणि नाशिक शहरातींली तीन मतदारसंघ, अमरावती शहताली दोन मतदारसंघ, नगर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि भंडारा शहर मतदारसंघात करण्यात येणार आहे.
ठळक वैशिष्टय़े
*एकूण मतदार – साडे आठ कोटींच्या आसपास
*राखीव मतदारसंघ – एकूण ५४. (अनुसूचित जाती – २९ तर अनुसूचित जमाती -२५)
*मतदार ओळखपत्रे – एकूण मतदारांच्या ९२ टक्के ओळखपत्रांचे वाटप
*एकूण मतदान केंद्रे – ९०४०३
*मतदान यंत्रे – दीड लाखांच्या आसपास
*उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा – २८ लाख
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
प्रतीक्षा घटस्थापनेची!
सुमारे साडेआठ कोटी मतदार असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी किंवा युतीचे चित्र अद्याप अधांतरी असले तरी निवडणुकीची अधिसूचना उद्या जारी होणार असून, त्याद्वारे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

First published on: 20-09-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections notification to be issued on saturday