भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपला अहंकार बाजूला ठेवून वाद मिटवावा आणि निवडणुकीला एकत्रितरित्या महायुतीच्या स्वरूपातच सामोरे जावे असे ठाम मत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सन्मानाने तोडगा काढावा अशी विनंती दोन्ही पक्ष नेत्यांना केली असल्याचेही ते म्हणाले. तसेच महायुती काही केल्या तुटणार नाही असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
महायुती अखंड रहावी अशी आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे. भाजप-शिवसेनेत सुरू असलेला वाद सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत आणि भाजपच्या ११९ जागांवरून सात-आठ जागा त्यांना वाढवून देऊन वाद मिटविण्याचा सल्ला उध्दव ठाकरेंना दिला असल्याचेही ते म्हणाले. देशात मोदींचे सरकार आल्याने यंदा राज्यातील भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. परंतु, स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा विचार केल्यास राज्यात सत्ता येणार नाही म्हणून भाजपनेही सामंजस्याची भूमिका घ्यावी असेही रामदास आठवले म्हणाले. तसेच महायुती तुटल्यास कोणत्याही फॉर्म्युल्यावर अद्याप विचार केलेले नाही मूळात महायुती तुटणार नाही अशी विश्वासार्ह भूमिका आठवले यांनी मांडली आहे. तसेच आमच्या पक्षाला दोन अंकी जागा मिळाव्यात अशी आमची मागणी याआधीच आम्ही मांडली आहे आणि ती कायम आहे असेही ते म्हणाले. 

Story img Loader