काँग्रेस संस्कृतीत पदावर नियुक्ती झाल्यापासूनच पाय खेचण्याचे उद्योग सुरू होतात, असे बोलले जाते, पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे लागोपाठ सहा वर्षे अध्यक्षपद भूषविणारे तसेच यापूर्वी पाच वर्षे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद तसेच लागोपाठ दोन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची एकप्रकारे दुर्मिळ संधी माणिकराव ठाकरे यांना मिळाली आहे. काँग्रेस पक्षसंघटनेत एवढी संधी कोणाच्याच वाटय़ाला आलेली नाही.
ऑगस्ट २००८ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी या पदावर सहा वर्षे पूर्ण केली. राज्यात काँग्रेसचा सहा वर्षे एवढे दीर्घ काल अध्यक्षपद भूषविणारे ठाकरे हे पहिलेच अध्यक्ष आहेत. १९९०च्या दशकात राज्य युवक काँग्रेसचे पाच वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या वर्धा येथील मेळाव्याच्या आदल्या दिवशी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेच्या वेळी माईक सुरू असल्याची बहुधा कल्पना नसल्याने ठाकरे यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याबरोबर केलेले संभाषण वादग्रस्त ठरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षाला पैसे देत नाहीत, असे ठाकरे बोलले आणि ते वाहिन्यांवर प्रसारित झाले. परिणामी ठाकरे यांची तेव्हा गच्छंती निश्चित मानली जात होती. पण थोडय़ाच दिवसांत ‘आदर्श’ घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण यांची विकेट गेली व माणिकराव बचावले ते अजून पदावर कायम आहेत.
गेल्या सहा वर्षांंत पक्षाची ताकद किती वाढली हा चर्चेचा विषय आहे. पण दिल्लीचा विश्वास असल्याने ठाकरे पदावर कायम राहिले. ‘अध्यक्षपदी निवड झाल्यावर लगेचच लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा राज्यात काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिला, असे माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे. अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसला फटका बसला व महाराष्ट्रातही काँग्रेसचा पराभव झाला. आपल्या सहा वर्षांंच्या प्रदेशाध्यपदाच्या काळात काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा त्यांनी केला. माणिकरावांचे विरोधक मात्र त्यांच्या मताशी सहमत नाहीत. २००९ मध्ये देशभर काँग्रेसला वातावरण अनुकूल होते व त्यात राज्यातही यश मिळाले. २०१२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा