माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारनिश्चितीवरून झालेल्या वादात शेवटच्या क्षणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. एकूण ५० जागांवर उभय नेत्यांचे एकमत होत नसल्याने अखेरीस छाननी समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, निवडणूक समितीचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी या जागांसाठी उमेदवारांची निश्चिती केली. त्यात मोहन प्रकाश यांनी प्रदेशाध्यक्षांची मर्जी सांभाळल्याचा दावा सूत्रांनी केला.
२३३ जागांवरील उमेदवारांच्या नावावर चव्हाण व ठाकरे यांची परस्पर सहमती झाली होती; परंतु ५० जागांवर नावांची निश्चिती होत नव्हती. उमेदवारनिश्चितीसाठी सलग तीन दिवस दिल्लीत बैठक घेतल्यानंतर समर्थकांच्या नावासाठी उभय नेते अडून बसले होते. त्यामुळे या जागांवरील उमेदवारांच्या निश्चितीसाठी निवडणूक समितीची बैठक न बोलावण्याचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांसमोर ठेवला. त्यामुळे ही पन्नास नावे खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत स्वतंत्रपणे ठरवण्यात आली. बैठकीत ठाकरे व चव्हाण यांना सहभागी करून घेण्यात आले नसल्याचा दावा काँग्रेस सूत्रांनी केला. चव्हाण व ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी उभय नेते एकजुटीने सामोरे जात असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा