राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी स्वत ऐवजी पुत्र ययातीसाठी पुसद मतदारसंघातून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्यानंतर आता कॉंग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर करून पुत्र राहुलसाठी यवतमाळ मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.
वास्तविक, माणिकराव ठाकरे यांचा मतदारसंघ दिग्रस-दारव्हा आहे. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेच्या संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांचा दोनदा आणि कांॅग्रेसच्या संजय देशमुखांचा एकदा पराभव करून विजयाची हॅटट्रीक केली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याविरोधात लढून पराभव पत्करण्यापेक्षा माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेला पसंती देऊन दोनदा आमदारकी मिळवली, तर संजय देशमुख यांनीही दिग्रस-दारव्हामधून न लढण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. माणिकराव ठाकरे यांनी आपण निवडणूक लढणार नाही. कारण, आपल्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे, असे यवतमाळात वार्ताहर परिषदेत सांगितले. विशेष हे की, कांॅग्रेसच्या विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल, हेही ठाकरे यांनी याच वार्ताहर परिषदेत सांगितलेले असतांना आणि यवतमाळ मतदारसंघात कांॅग्रेसच्या नंदिनी पारवेकर आमदार असतांना या मतदारसंघासाठी कांॅग्रेसने मुंबईत इतर उमेदवारांच्या मुलाखती कशा घेतल्या, हाही चच्रेचा विषय आहे.
मुंबईत झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये आमदार नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष आणि माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व महिला कांॅग्रेसच्या राष्ट्रीय सचिव संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे. नंदिनी पारवेकरांचा पत्ता कट झाल्यास राहुल ठाकरे हेच उमेदवार असतील, अशी सार्वत्रिक चर्चा आहे.
हरीभाऊ राठोडांना विधानसभेचे डोहाळे?
माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधान परिषदेचे आमदार असूनही दिग्रस-दारव्हा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त
केल्याने या मतदारसंघात अनेक इच्छुकांनी जोरदार आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण सभापती देवानंद पवार यांनी निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू करून कांॅग्रेसतर्फे निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. या मतदारसंघात बंजारा असलेल्या सेनेच्या आमदार
संजय राठोड यांच्याविरोधात कांॅग्रेसला बंजारा उमेदवार हवा असल्याने देवानंद पवार यांचे नाव आघाडीवर असतांना भटक्या-विमुक्तांचे नेते आमदार हरिभाऊ राठोड विधानसभा लढण्याची इच्छा कशासाठी व्यक्त करतात, याचा मागोवा घेतला असतांना त्यांना मंत्री व्हायची इच्छा आहे. त्यांच्या मते मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी विधान परिषदेतून अशी वर्णी लागणे अवघड असून त्यासाठी विधानसभेचा विचार करावा लागतो. मंत्री होण्याची इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर
जाहीर केलेली आहे, हेही उल्लेखनीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा