विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकून व अनेक जागांवर आश्चर्यकारक मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणाऱ्या एमआयएम या पक्षाने आता रिपब्लिकन नेतृत्वावर टीका करीत दलित कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भविष्यात दलित-मुस्लिम राजकीय आघाडीद्वारे काँग्रेसपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे सुतोवाच  एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी सोमवारी केले.
एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्या प्रक्षोभक भाषणांबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे, किंबहुना सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम हा पक्ष देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे, याकडे जलिल यांचे लक्ष वेधले असता, ओवेसे यांना त्याबद्दल दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली व सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य राहील, न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सांगितले. प्रणिती शिंदे यांना त्यांच्याकडे एमआयएमच्या विरोधात काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असे आव्हान जलिल यांनी दिले.  
एमआयएम हा फक्त मुस्लिमांचा पक्ष आहे, ही टीका अनाठायी असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादध्ये रिपब्लिकन नेते गंगाधर गाडे यांनी एमआयएमने पाठिंबा दिला होता. कुर्ला मतदारसंघातील उमेदवार दलित समाजातील होता. हैदराबादमध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले अनेक उमेदवार दलित व अन्य समाजातील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात दलित समाजाचे दलित नेत्यांनीच मोठे नुकसान केले आहे, अशी टीका त्यांनी करीत दलित-मुस्लिम राजकीय आघाडीचे त्यांनी सुतोवाच केले. या पूर्वी १९८० च्या दशकात प्रा. जोगेंद्र कवाडे व हाजी मस्तान यांनी एकत्र येऊन दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ स्थापन केला होता, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही व अल्पावधीतच नामशेष झाला. आता पुन्हा एकदा एमआयएमचा तसा प्रयत्न सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा